अहिल्यानगर
देशभक्ती आणि संस्कारशक्तीची ज्ञानज्योत तेवत राहिली पाहिजे – डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : मुले ही देवाघरची फुले असतात असे समजून आजच्या बालकांचे पोषण आणि शिक्षण झाले पाहिजे, त्यांच्यात देशभक्ती आणि संस्कारशक्तीची ज्ञानज्योत तेवत राहिली पाहिजे हे कार्य ‘रायझिंग’ सारखी आदर्श शाळा करीत असल्याचे मत साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील एकलव्य सेवाभावी संस्था, संचालित रायझिंग स्टार नर्सरी स्कुल, श्रीरामपूर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन सोहळा विविध उपक्रमांनी संपन्न झाला. त्याप्रसंगी ध्वजारोहण केल्यानंतर आणि विविध उपक्रम संपन्न झाल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.शिवाजीराव बारगळ होते. प्रा.कु. हर्षाली बारगळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ध्वजारोहण झाले. भारतमाता प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. संयोजक हौशीराम डमाळे यांनी स्वागत करून स्कुलचा प्रगती अहवाल सादर केला. पाहुण्यांचे सत्कार केले.
समन्वयक हौशीराम डमाळे यांनी नियोजन करून पालकांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी भारतीय लोकशाही आणि प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगून ॲड. शाळीग्राम होडगर यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक योगदान सांगितले. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचे महत्व सांगून रायझिंग शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. प्रा.कु.हर्षाली बारगळ यांचा सत्कार करण्यात आला, त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. रोहिणी वाघस्कर यांनी सूत्रसंचालन केले. योगिता पांढरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. वर्षा मटाले, ज्योती भडके, वृंदा बेलसरे यांनी नियोजनात भाग घेतला. ज्योती भडके यांनी आभार मानले. सुंदर आणि दिमाखदार अशा कार्यक्रमास पालक, विद्यार्थी उपस्थित होते.