ठळक बातम्या
नगर- मनमाड महामार्गाचं वाटोळं, संतप्त जनतेकडून लोकप्रतिनिधी व शासनाचं श्राध्द
बाळकृष्ण भोसले | राहुरी : नगर – मनमाड महामार्गावर असलेल्या अनेक खड्ड्यामुळे व एकेरी वाहतुकीमुळे आजवर शेकडो महिला, बालक व प्रौढांसह ज्येष्ठ नागरिकांचे बळी गेले आहेत. अनेकांना अपंगत्व आलेय. यामुळे नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने लोकप्रतिनिधी व सरकार यांचा दशक्रियाविधी घालून राहुरी सूतगिरणी जवळ नाविन्यपूर्ण आंदोलन छेडले.
या आंदोलनाची प्रवासी वर्गात दिवसभर चर्चा सुरू होती. सरकार व लोकप्रतिनिधी यांच्या निषेधार्थ पिंडदानाच्या केलेल्या आंदोलनामुळे सरकारसह ठेकेदार खडबडून जागे झाले आहे. आठ दिवसाच्या आत खड्डे बुजविण्याचे काम, तर दुहेरी वाहतूक सुरू करण्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन महसूल विभागाच्या वतीने व संबधित ठेकेदाराने आंदोलन स्थळी निवेदन स्वीकारताना दिले. नगर-मनमाड महामार्गवरील राहुरी सूतगिरणी जवळ नगर-मनमाड कृती समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे पिंडदान करून व दशक्रियाविधी करत आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात अनेक दिग्गज लोकप्रतिनिधी आहेत, जे राज्याला दिशा देतात. पणं ‘दिव्याखाली अंधार’ या उक्तीप्रमाणे आपलचं घरं जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना सांभाळता येईना अशी आज नगर- मनमाड महामार्गाची अवस्था झाली आहे. कोल्हारच्या पुलावर तर नेहमीच अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. आजवर सुतगिरणीजवळ अपघातात प्रवाशांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. शासनाने गब्बर केलेल्या लोकप्रतिनिधींचे पगार कापून या महामार्गासाठी वापरावेत. ठेकेदार, शासन व लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करत अपघात ग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची भावना संतप्त आंदोलकांनी प्रसंगी व्यक्त केली.
यावेळी नगर-मनमाड कृती समितीचे सदस्य प्रमोद विधाटे यांनी पिंडदान केले. यावेळी सुनील काळे गुरू यांनी पौरोहित्य केले. ह.भ.प बाबा महाराज मोरे यांचे प्रवचन झाले. या प्रवचनातून सरकारचा, ठेकेदाराचा व महसूल अधिकाऱ्यांचा निषेध करून आजपर्यंत नगर-मनमाड मार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. पिंड दानानंतर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करताना तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.
या प्रसंगी देवेंद्र लांबे, वसंत कदम, शिवचरित्रकार हसन सय्यद, सतीश घुले, प्रकाश भुजाडी, दीपक त्रिभुवन, सुरेश वाबळे, रवींद्र मोरे, सुरेश निमसे, जयसिंग घाडगे ,प्रशांत वाबळे, सुजित वाबळे, राजेंद्र बोरुडे, अनिल येवले, दत्ता गागरे, डॉ.रवी घुगरकर, राजेंद्र लोखंडे, सुधाकर आदिक, सुनील विश्वासराव, विजय गव्हाणे, शरद खांदे, साईनाथ बर्डे, सोमनाथ कीर्तने, आबासाहेब वाळुंज, प्रदीप गरड, अभिजित आहेर, शरद म्हसे, वैभव गाडे, विक्रम गाडे, प्रशांत विश्वासराव, दत्ता दरंदले, संदीप कदम, दत्तू साळुंके, संदीप कोठुळे, ज्ञानेश्वर मोरे, सुनील जाधव, राजू साळुंके, निखिल भुजाडी, अमोल कदम, प्रसाद कदम, सुयोग सिनारे, मयूर मोरे, योगेश सिनारे, मनोज कदम, प्रणय भोसले आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पसायदानाने या दशक्रिया आंदोलनाची सांगता झाली.