पश्चिम महाराष्ट्र
पुणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आयोजित चर्चासत्र संपन्न
राहुरी : पुणे येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या अंकुशे ग्रुप ऑफ कंपनी च्या सभागृहात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य सैनिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
देशाच्या सीमेवर सैनिक तर शेताच्या बांधाच्या आत जगाचा पोशिंदा हा अहोरात्र लढत असतो. देशाच्या सर्वागींण विकासासाठी शेतकरी आणि सैनिक महत्त्वाचा दुवा असुन हे दोन्ही घटक एकत्र आले तर देशाला महासत्ता बनविण्यासाठी कोणी ही रोखु शकत नाही हे सत्य आहे. देशातील ९०% सैनिक हे भूमिपुत्र आहेत. या चर्चासत्रात भविष्यातील राजकारण, शेतकर्यांचे ज्वलन प्रश्न, व माजी सैनिक, वीर नारी, विधवा यांच्या समस्या आदी विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजू शेट्टी, युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा संदिप जगताप, माजी सैनिक आघाडीचे अध्यक्ष नारायण अंकुशे, सैनिक एकता परिषदेचे चंद्रहार पाटील, सैनिक समाज पार्टीचे कार्याध्यक्ष तुकाराम डफळ, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब तारडे पाटील, माजी सैनिक संतोष दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. “जय जवान जय किसान” च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली. या चर्चा सत्रात महाराष्ट्र राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.