कृषी
महात्मा फुले कृषि विद्यापीठात भव्य कृषि प्रदर्शन व कृषि पदवीधर रोजगार मेळावा
महात्मा फुले कृषि विद्यापीठात एमपीकेव्ही क्लायमेक्स-2022 चे आयोजन
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दि. 20 ते 22 डिसेंबर, 2022 दरम्यान कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे संकल्पनेतून आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठातील नाहेप-कास्ट प्रकल्प व माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नातून एमपीकेव्ही क्लायमेक्स-2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 20 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 10.00 वा. नानासाहेब पवार सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे शिक्षण विभागाचे उपमहासंचालक व नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर. सी. अग्रवाल हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील असणार आहेत. या एमपीकेव्ही क्लायमेक्स-2022 मध्ये वेगवेगळ्या आठ विषयांवर तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये व्हल्यु चेन-शेतकरी उत्पादक कंपन्या, बियाणे प्रक्रिया व लागवडीची रोपे, कृषि यंत्रे व अवजारे तसेच जल व्यवस्थापनाचे साधने, रासायनिक औषधे, बुरशीनाशके व तणनाशके, खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये, डेअरी, अन्नप्रक्रिया व पदार्थ, काटेकोर, हायटेक व डिजीटल शेती, कृषि विमा इ. विषयांवर तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.