कृषी
महात्मा फुले कृषि विद्यापीठात एमपीकेव्ही क्लायमेक्स प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे नाहेप-कास्ट प्रकल्प व माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नातून एमपीकेव्ही क्लायमेक्स – 2022 या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषि प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये कृषि विषयक विविध कंपन्यांचे 40 पेक्षा जास्त स्टॉल्स, विद्यापीठातील विविध संशोधन प्रकल्पांचे 10 स्टॉल्स तसेच विविध कृषि महाविद्यालयांच्या 30 स्टॉल्सचा यामध्ये समावेश आहे. याचबरोबर गृहपयोगी वस्तूंच्या 20 स्टॉल्सचाही या प्रदर्शनात समावेश आहे. या प्रदर्शनाबरोबरच यावेळी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 21 नामांकीत कंपन्या सहभागी झाल्या असून 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या आहेत. प्रदर्शनाच्या दुसर्या दिवशी कृषि महाविद्यालय पुणे, धुळे, कोल्हापूर तसेच डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि पदव्युत्तर महाविद्यालय येथील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा भरविण्यात आला.
या मेळाव्यामध्ये 5000 च्या वर माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याबरोबरच डॉ. नानासाहेब पवार सभागृहात तांत्रिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये व्हल्यु चेन-शेतकरी उत्पादक कंपन्या, बियाणे प्रक्रिया व लागवडीची रोपे, कृषि यंत्रे व अवजारे तसेच जलव्यवस्थापनाचे साधने, रासायनिक औषधे, बुरशीनाशके व तणनाशके, खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये, डेअरी, अन्नप्रक्रिया व पदार्थ या विषयांवर विविध तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या एमपीकेव्ही क्लायमेक्सच्या पहिल्या दिवशी 20000 च्या वर शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेट दिली आणि दुसर्या दिवशी 25000 च्या वर शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेट दिली. खास करुन कृषि शिक्षण प्रदर्शनाच्या दालनाला विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.