अहिल्यानगर
रंजीत दातीर यांच्या जीतशार कंपनीमुळे शेतकरी समृद्ध होईल : तालुका कृषी अधिकारी साळी
श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : रंजीत दातीर ह्यांनी एमसीएल मुंबईचे शाम शिवाजी घोलप यांच्या सहभागातून श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे नियोजित जीतशार कंपनीच्या बायो इंधन प्रकल्पामुळे शेतकरी समृद्ध होईल, असे मत श्रीरामपूर तालुका कृषी अधिकारी अशोकराव साळी यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर कृषी विभाग कार्यालयात आयोजित शेतकरी आणि ग्रामसमृद्धीसाठी जीतशार कंपनीचे निवेदन आणि माहिती पुस्तिका स्वीकारल्यानंतर अशोकराव साळी बोलत होते. प्रारंभी प्रा.डॉ.बबनराव आदिक यांनी आपल्या प्रास्ताविक मधून रंजीत दातीर आणि शाम शिवाजी घोलप यांच्या शेतकरी आणि ग्राम आरोग्यविषयी मनोगत व्यक्त केले. कृषी पर्यवेक्षक श्रीधर बेलसरे यांनी उपस्थित अधिकारी यांचा परिचय करून दिला. तालुका कृषी विभागातील विविध उपक्रम, समस्या आणि शेतकरी हितासाठी चालू असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘संत संस्कृतीची ज्योत ‘कविता संग्रहाबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. उपाध्ये हे साहित्यिक मित्र शेतकरी जीवनावर लिहितात त्याबद्दल कौतुक केले. अशोकराव साळी यांनी आपणास वाचनाची आवड असून जीतशार प्रोड्युसर कंपनीतर्फे डॉ. बबनराव आदिक यांच्या खानापूर शेतजमिनीत उभारण्यात येत असलेल्या बायो इंधन प्रकल्पाचे कौतुक केले.
यावेळी जीतशार कंपनीचे प्रमुख रंजीत दातीर यांनी सविस्तर विवेचनातून बायो इंधन निर्मितीमुळे देश अर्थकारण आणि आरोग्यशील जीवनदृष्टीने समाधानी होईल अशी माहिती दिली. यावेळी कृषी अधिकारी अश्विनी गोडसे, कृषी सहायक अधिकारी अनिल शेजूळ, कृषी पर्यवेक्षक अंजली उंडे, रियाज शेख, प्राजक्ता नवाते, तंत्र अधिकारी पांडुरंग साळवे आदी उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी या विभागाच्या 100 एकर जमिनीचे पिकक्षेत्र आणि वन्य वनस्पतीची लागवड झाली तर हा विभाग शेतकरी वर्गाला आदर्शमय होईल असे मत व्यक्त करून ह्या विभागातील उपक्रमाचे कौतुक केले. श्रीधर बेलसरे यांनी आपण लवकरच शेतकरी प्रबोधन मेळावा आयोजित करून आपल्या गिन्नी गवताचे महत्व पटवून देऊन बायो इंधन निर्मिती प्रकल्पास सहकार्य करू असे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.