अहिल्यानगर
सिल्लोड येथील कृषि प्रदर्शनासाठी राहुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञ रवाना
राहुरी विद्यापीठ : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे दि. 1 जानेवारी ते 5 जानेवारी, 2023 या दरम्यान होणाऱ्या कृषि महोत्सवासाठी कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कर्मचारी विशेष बसद्वारे रवाना झाले. या बसला विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. तानाजी नरुटे म्हणाले की या कृषि महोत्सवातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या स्टॉलमध्ये विद्यापीठाने विकसित शेतकरीभिमुख तंत्रज्ञान, विद्यापीठ विकसित विविध पिकांचे वाण, ड्रोन तंत्रज्ञान व इतर तंत्रज्ञान बघण्यास मिळणार आहे. या विद्यापीठाच्या प्रदर्शनाच्या स्टॉलला जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी भेट देऊन विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दलची माहिती घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.