धार्मिक

“देवाजवळ आल्यास त्याच्या कृपेचा अनुभव अधिक गहिरा होतो” – फा. मॅक्यानरो लोम्पीस

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संत तेरेजा चर्च, मतमाउली भक्तिस्थान, हरिगाव येथे १९ जुलै रोजी यात्रापूर्व तिसऱ्या शनिवारी “पवित्र मरिया पाप्यांच्या आश्रया” या विषयावर नोव्हेना भक्ती पार पडली. या भक्तिपर्वाला उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना संत अन्ना चर्च, अहिल्यानगरचे प्रमुख धर्मगुरू फा. मॅक्यानरो लोम्पीस यांनी पवित्र मरीयेच्या पवित्रतेचे व कृपेचे महत्त्व अधोरेखित केले.

त्या प्रवचनात फा. लोम्पीस म्हणाले, “पवित्र मरिया जन्मतःच निष्कलंक होती. ती पापमुक्त राहिली म्हणूनच परमेश्वराने तिला आपले साधन बनवले. आपण जरी सामान्य आणि पापी माणसे असलो, तरी तिच्या प्रेरणेतून पवित्र जीवन जगता येते. देवाजवळ येणे म्हणजेच त्याच्या कृपेतील वाढ आहे. पवित्र मरिया आपल्याला हेच शिकवते की पापांवर मात करता येते आणि एक शुद्ध जीवन देवाला अर्पण करता येते.”

या दिवशी नोव्हेनाच्या निमित्ताने पवित्र मरिया मातेपुढे एकत्रित प्रार्थना करण्यात आली. भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला. चिल्ड्रेन्स ऑफ मदर मेरी ग्रुपतर्फे सर्व भाविकांना स्नेहभोजनही देण्यात आले.

कार्यक्रमात फा. डॉमनिक रोझारिओ (हरिगाव), फा. फ्रान्सिस ओहोळ, फा. संतान (सावेडी), फा. नथांलीयन, फा. विश्वास परेरा, फा. ब्लेस फर्नांडिस, फा. रिचर्ड डिसिल्वा, फा. अजित मुनीस, फा. मॅवरॉन फर्नांडिस यांच्यासह अनेक धर्मगुरू व सिस्टर्स सहभागी झाले होते.

येत्या २६ जुलै रोजी यात्रापूर्व चौथ्या शनिवारी “पवित्र मरिया – प्रेषितांची राणी” या विषयावर प्रवचन होणार असून त्यासाठी सेक्रेड हार्ट चर्च (सोनगाव) व संत जोसेफ चर्च (पानोडी) येथील धर्मगुरू सहभागी होणार आहेत. या भक्तिमय कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन हरिगावचे प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक रोझारिओ आणि त्यांचे सहकारी धर्मगुरू यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button