अहिल्यानगर
नगरचे पोलीस अधीक्षक रूजू, राहुरी पोलिसांची दमदार कामगिरी जिल्ह्यात राहणार अव्वल
राहुरी | बाळकृष्ण भोसले : अहमदनगर जिल्ह्यात नवीन पोलिस अधिक्षक म्हणून राकेश ओला नियुक्त झाल्यापासून तालुक्यातील अवैध धंद्यावर टाच आणली जात आहे. कार्यक्षम अधिकारी पदावर बसल्यानंतर ‘ना तुझ न माझ फक्त कर्तव्य जनतेचं’ या उक्तीप्रमाणं राहुरीचे पोलिस सध्या कर्तव्यतत्पर झाल्याचे दिसत असल्याने जनतेचा पोलिसांप्रती विश्वास वाढलेला निश्चितपणे दिसत आहे. पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांच्या आत्मविश्वासाला आणखी झळाळी नवा अधिकारी रूजू झाल्याने मिळाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राहुरी पोलिस ठाण्यात निरिक्षक दराडे रूजू झाल्यापासून तसा अवैध व्यावसायिकांचा मुलाहिजा त्यांनी ठेवला नाही हे त्यांचे काम निश्चितच वाखाणण्याजोगे आहे, अपवाद आहेत परंतू ते मनापासून कार्यरत आहेत. मग त्यात हातभट्टी, देशीची चोरटी वाहतूक, महामार्गावरील हाॅटेल, लाॅजिंगमधील अवैध वेश्या व्यवसाय, वाळू तस्करी, बरोबरच शिक्षण घेत असलेल्या पोरीबाळींना त्रास देत असलेले टारगट पोरं, चेन स्केचिंग आदी घटनांवर पूर्णत: लक्ष ठेवून आहेत. एकंदरीत दाखल गुन्हे व निपटारा पाहता राहुरी पोलिसांची कामगिरी अव्वल राहिली हे नाकारता येत नाही.
यात नव्याने रूजू झालेले अधिक्षक यांच्या अल्पकाळात राहुरी पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत एकूण ३ केसेस दाखल होत त्यातून ६१२४५ रूपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दारूबंदी कायद्या अंतर्गत ११ केसेस दाखल होत २४३०८ रूपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अवैध वाळू वाहतूकीतून २३ लाख ८४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान बुधवारी रात्री तालुक्यातील धामोरी येथे हातभट्टीचे मोठे रॅकेट उध्वस्त करत जवळपास दोन लाखाचा मुद्देमाल पकडला. सेनापती सरस असला तर सैन्य सक्षम असते हे याचा प्रत्यंतर तालुक्यात येतो आहे. मात्र यात सातत्य टिकवून ठेवत महामार्गावरील अवैध व्यवसायावर लक्ष केंद्रित करणेही तितकेच महत्वाचे आहे. पोलीस निरीक्षक दराडे कार्यक्षम अधिकारी म्हणून गणले जातात ती कार्यशैली त्यांनी कायम ठेवावी याच अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहेत.