कृषी

डॉ. एम.एस. स्वामिनाथन म्हणजे विज्ञान, राष्ट्रसेवा आणि शेतकर्यांप्रती निष्ठा यांचे मुर्तीमंत उदाहरण – अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे

राहुरी विद्यापीठ : डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांनी केलेल्या संशोधनाचा गाभा अन्नधान्य उत्पादन वाढविणे हाच राहिला. त्यांनी संशोधीत केलेल्या गहू आणि तांदळाच्या उच्च उत्पादक वाणांमुळे देशात अन्नधान्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन भारत अन्नधान्यात आत्मनिर्भर झाला. ज्यामुळे देशात हरित क्रांतीचा उदय झाला. डॉ. स्वामिनाथन यांच्या कार्यामुळे केवळ उत्पादन वाढले नाही तर त्यांनी शेतीच्या शाश्वततेवर भर देवून शाश्वत शेती या संकल्पनेचा पुरस्कार केला. डॉ. स्वामिनाथन यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे विज्ञान, राष्ट्रसेवा आणि शेतकर्यांप्रती निष्ठा यांचे मुर्तीमंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.

कृषी क्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त शाश्वत कृषी दिनाचे आयोजन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. सुनील भनगे, क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रा. जी.बी बाचकर, डॉ. व्हि.डी. वाळे आदींसह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुधीर तांबे, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ व डॉ. सुनील भणगे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार प्रा. जी.बी. बाचकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button