अहिल्यानगर
महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक -विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे
राहुरी विद्यापीठ : महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी व समाजातील अविकसित घटकांसाठी, समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा यांच्या विरुद्ध अखंडितपणे काम करून स्वतःचे आयुष्य समाजासाठी झोकुन दिले. त्यांचे विचार आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील विस्तार शिक्षण संचालक डॉ तानाजी नरुटे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव व राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, पदव्युतर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, कुलसचिव प्रमोद लहाळे, हळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.गोरक्ष ससाने, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे आणि क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड उपस्थित होते.
यावेळी डॉ. दिलीप पवार, डॉ. उत्तम चव्हाण यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर भाषणे करण्याची संधी देण्यात आली. याप्रसंगी कु. साक्षी निकम, अंगद लाटे, प्रशांत शिंदे व कु. अंकिता नेवसे या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुराज जोडवे याने तर आभार प्रदर्शन निलेश मावळे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. प्रेरणा भोसले व राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रा. कीर्ती भांगरे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.