अहिल्यानगर
प्रवरा उद्योग समूहाचे संस्थापक, शिर्डी मतदारसंघाचे पहिले आ. स्व चंद्रभान घोगरे पाटील यांची जयंती साजरी
राहाता : शिर्डी विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार स्व. चंद्रभान घोगरे पाटील यांची ९९ वी जयंती लोणी खुर्द ग्रामपंचायत सह सेवा संस्था, रयत शिक्षण संकुलात साजरी करण्यात आली. ते लोणी खुर्द गावाचे भूमिपुत्र असुन लोणी खुर्द गावासह, लोणी खुर्द सेवा संस्था, प्रवरा उद्योग समूह, शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे संस्थापक असुन मतदार संघाचे पहिले आमदार होते. महाराष्ट्राचे संस्थापक पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण, हरित क्रांतीचे जनक डाॅ आण्णासाहेब शिंदे यांचे अत्यंत विश्वासु निकटवर्तीय होते.
स्वर्गीय चंद्रभान घोगरे यांनी स्वातंत्र्य पुर्व व स्वातंत्र्य नंतर त्यांनी खुप मोठे कार्य केले. प्रवरेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा असुन त्यांनी अर्थतज्ज्ञ डाॅ धनंजयराव गाडगीळ, डाॅ आण्णासाहेब शिंदे, पद्मश्री विखे पाटील, काॅ आ पी.बी.कडु पाटील या सहकार्यासह सहकार चळवळीच्या माध्यमातून प्रवरा उद्योग समूहाच्या उभारणीत मोठे कार्य केले. ते प्रवरा कारखान्याच्या इतिहासात सर्वाधिक दीर्घकाळ पन्नास वर्ष संचालक व त्यातील काही काळ अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. प्रवरा शिक्षण संस्था, प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे ते स्थापनेपासून विश्वस्त तर काही काळ उपाध्यक्ष होते. जिल्हातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, कर्मवीर शंकरराव काळे, यशवंतराव भांगरे, गोविंदराव आदिक, दादा पाटील राजळे, मोतीलाल फिरोदिया, बाबुराव तनपुरे, शंकरराव कोल्हे, यांच्यासोबत सहकारात उल्लेखनीय काम केले.
जिरायत भागातील जनतेला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासाठी ते आग्रही होते. त्यामुळेच त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात निळवंडे धरणाला पहिली मान्यता मिळाली व त्याचं वेळी निळवंडेचे भुमिपुजन तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले. स्वर्गीय आ. चंद्रभान घोगरे पाटील यांच्या ९९ व्या जयंती निमित्त लोणी खुर्द ग्रामपंचायत सह लोणी खुर्द सेवा संस्था, रयत शिक्षण संकुल लोणी मध्ये त्याच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रा.प चे पदाधीकारी ग्रामविकास अधिकारी, सेवा संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन संचालक मंडळ, सेक्रेटरी, कर्मचारी, रयत शिक्षण संकुल लोणी प्राचार्य शिक्षक, शिक्षकेतर ग्रामस्थ उपस्थित होते.