शिक्षणवारी ज्ञान पंढरी
डॉ. बापुसाहेब भाकरे यांना मृदविज्ञान संस्थेची फेलोशिप प्रदान
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातर्फे भारतीय विज्ञान संस्थेचे 86 वे वार्षिक अधिवेशन नुकतेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे पार पडले. मृदशास्त्रातील भरीव कार्याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या मृदशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे यांना मृदविज्ञान संस्थेची फेलोशिप भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे उपसंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.
डॉ. बापुसाहेब भाकरे हे गेल्या 38 वर्षापासून कृषि विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण व विस्तार या क्षेत्रात कार्यरत आहेत. शेतकर्यांच्या उत्पादन वाढीसाठी त्यांनी 42 विविध शिफारशी दिल्या असून त्याचा राज्यातील शेतकर्यांना आर्थिक फायदा झाला आहे. त्यांनी आजतागायत 140 हुन अधिक संशोधन लेख, 21 पुस्तके, विविध वृत्तपत्रे व मासिके यातून शेतकर्यांसाठी कृषि विस्ताराचे कार्य केले आहे. याशिवाय शेतकर्यांसाठी विविध प्रशिक्षणे, शेतकरी मेळावे यांचे आयोजन केले आहे. विविध परिसंवादामध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे.
राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सचिव म्हणून त्यांनी कार्य केले आहे. आकाशवाणी, दुरदर्शन यांच्या माध्यमातून कृषि विस्ताराचे कार्य केले आहे. त्यांना आत्तापर्यंत वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार, मृदगंध पुरस्कार, कृषिथॉन पुरस्कार, ॲग्रोकेअर आयडॉल पुरस्कार, उत्कृष्ट संशोधन लेख इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, कुलसचिव प्रमोद लहाळे व कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.