अहिल्यानगर
देवळाली प्रवरा शहराच्या भूमिगत गटार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता
• पहिल्या टप्प्यात राहुरी फॅक्टरीपासून कामास सुरुवात
• भूमिगत गटार कामाचे श्रेय शहरवासियांच्या विश्वासाला
राहुरी शहर/ अशोक मंडलिक : राज्यातील नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा भूमिगत गटार (मलनिस्सारण) प्रकल्प नगरपरिषद संचालनालयामार्फत संदर्भाधीन क्र. ६ च्या पत्रान्वये राज्यस्तरीय मान्यता समितीकडे मान्यतेकरिता सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प समितीने दि. १९ मार्च, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत केलेल्या शिफारशीनुसार व मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाशिक यांनी संदर्भ क्र. ९ अन्वये चालू दरसूचीनुसार दिलेल्या तांत्रिक मान्यतेस अनुसरून सादर केलेल्या देवळाली प्रवरा शहराच्या पहिल्या टप्प्यातील ५० कोटींच्या भूमिगत गटार प्रकल्पास राज्य शासनाने शासन निर्णय काढून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे व तो शासन निर्णय मंत्रालयात समक्ष माझ्याकडे सुपूर्द करण्यात आला असे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले आहे.
नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले कि देवळाली प्रवरा शहराचा नागरिकांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी मला मोठ्या विश्वासाने लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले. त्या विश्वासास पात्र राहून मी विकास हि माझी प्राथमिक जबाबदारी समजली. ती जबाबदारी ओळखून मी नगराध्यक्ष झाल्यापासून देवळाली प्रवरा शहराच्या विकास कामांना प्राधान्य दिले. तेच प्राधान्य समजून आपल्या शहरातील भूमिगत गटार (मलनिस्सारण) प्रकल्प व्हावा यासाठी मी निवडून आल्यापासून प्रयत्नशील होतो. त्या प्रस्तावास लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी कोविड काळ असून पाठपुरावा सोडला नाही व त्यात जवळपास अडीच वर्ष गेले. हा प्रस्ताव आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका शाखा, अहमदनगर त्यांच्या कडून मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाशिक यांना व त्यानंतर सचिव, नगर विकास मंत्रालय, मुंबई यांना सादर करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात प्रत्येक विभागात येणाऱ्या प्रत्येक त्रुटींची पूर्तता केली व त्याचा पाठपुरावा सोडला नाही. त्याचे फलित म्हणून आज आपल्या शहराच्या विकासात आणखी भर पडून संपूर्ण शहरासाठी महत्वकांक्षी असलेल्या या भूमिगत गटार (मलनिस्सारण) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ५० कोटींच्या योजनेला आज राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून प्रशासकीय मंजुरीचा शासन निर्णय काढून व तो माझ्या हाती सुपूर्द करून या प्रकल्पास खऱ्या अर्थाने मंजुरी मिळाली आहे. यावेळी त्यांनी राज्य शासनाचे व नगरविकास मंत्रालयाचे मी आभार मानतो व याचे श्रेय मी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सर्व अधिकारी-कर्मचारी व विशेषकरून माझ्या शहरातील नागरिकांना देतो असे नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले.
पुढे बोलतांना नगराध्यक्ष कदम म्हणाले कि संपूर्ण शहरासाठी हा मलनिस्सारणचा प्रकल्प एकूण प्रकल्प ८२.७७ कोटींचा आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील ५० कोटींच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे व पहिला टप्पा हा आम्ही जाणीवपूर्वक राहुरी-फॅक्टरी (श्रीशिवाजीनगर) संपूर्ण गावठाण परिसरासाठी घेतला आहे. राजकीय दृष्टीकोनातून आजवर अनेक आरोपप्रत्यारोप झाले कि राहुरी-फॅक्टरी (श्रीशिवाजीनगर) परिसरावर दुजाभाव केला जातो व सपत्नीक वागणूक दिली जाते. परंतु माझ्या काळात मी या बाबत कधीच असा विचार केला नाही व होणार देखील नाही. राहुरी-फॅक्टरी परिसरात जलतरण तलाव, योगाभवन यासारखे प्रकल्प प्रगतीपथावर आहे व गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला राहुरी कारखाना स्मशानभूमीचा प्रश्न चार वर्षे पाठपुरावा करून सोडविला व त्यात आणखी एक भर म्हणजे पहिल्या टप्प्यातील भूमिगत गटार (मलनिस्सारणचा) प्रकल्प आपण याच भागात घेत आहोत. यामध्ये सर्वेक्षण, संकलन नेटवर्क झोन, मुख्य वाहिका, पंपिंग स्टेशन, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल काम, ११केव्ही एक्स्प्रेस फिडर, सोलर पॉवर प्लांट, कंपाउंड वॉल, आप्रोच रोड, मालमत्ता कनेक्शन (हाऊस सर्व्हिस कनेक्शन), युटिलिटी शिफ्टिंग, रस्त्याचा विकास, ट्रायल रन, सक्शन मशीन असे एकूण ५० कोटींची हि पहिला टप्प्यातील भूमिगत गटारचा (मलनिस्सारणचा) प्रकल्प आहे.
याशिवाय गेल्या ५ वर्षाच्या माझ्या कार्यकाळात देवळाली प्रवरा शहराच्या सर्वच भागात विकासकामे केली. त्यात वाढीव पाणीपुरवठा योजना १५ कोटी, घनकचरा व्यवस्थापन मशिनरी २.८५ कोटी, विशेष रस्ता अनुदान ३ कोटी, ठोक निधी ४ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजेन अंतर्गत शहरातील व्यवसायाला व उद्योगधंद्यांना चालना मिळावी यासाठी शॉपिंग सेंटर इमारत २ कोटी, सोलर प्रकल्प, महिला व्यायाम शाळा, पुरुष व्यायाम शाळा, योगा भवन, रस्ते डांबरीकरण, मजबुतीकरण, खडीकरण व मुरुमीकरण असे मूलभूत गरजा असणारे सर्व विकास कामे केली. त्याशिवाय अनेक वर्षांपासून वादात असलेले रस्त्यांची कामे केली व या कामांना सोडून शहरातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी जलसंधारणाचे ओढे खोलीकरण व रुंदीकरणाचे कामे हाती घेतले व जवळपास १४ किमी पर्यंतचे काम पूर्णत्वास नेले आहे. आगामी काळात राहिलेले जलसंधारणाचे कामे देखील होतील, असे अनेक विकासकामे माझ्या व माझ्या नगरसेवक व बाकी सर्वच सहकाऱ्यांच्या माध्यमातून झाले. या कामांचा मला नक्कीच अभिमान वाटतो. कोण काय बोलते व काय आरोप प्रत्यारोप करते याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. कारण माझं उद्दिष्टे फक्त शहराचा विकास हाच आहे व कायमस्वरूपी माझ्या शहरवासीयांच्या सेवेसाठी करत राहील. निवडणुका येतील व जातील परंतु आजचे नागरिक सुज्ञ आहेत शहराच्या विकासासाठी दृष्टिकोन असावा लागतो. तो नक्की कोणाकडे याचा विचार नागरिक करतातच. वैयक्तिक माझा अनुभव कमी असताना देखील नगरपरिषद स्थापने पासूनचा आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त कामे केली व त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहिलो. त्यामुळे नागरिक नक्कीच माझ्या पाठीशी उभे आहेत याचा मला विश्वास आहे. काही लोक श्रेयासाठी धडपड करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, त्यांना काय करायचे ते करू द्या, माझा शांत राहण्याचा स्वभावगुण नसतांना मी जनतेच्या हिताच्या दृष्टीने नेहमीच त्याकडे दुर्लक्ष केले. आगामी येऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. निवडणूक कशी लढवायची, विकासकामे कशी करायची याचा मला चांगला अनुभव आला आहे व त्याचा निर्णय माझ्या शहरातील सुजाण नागरिक निवडणुकीत घेतील. पण माझ्या शहराचा विकास हेच उद्दिष्टे ठेवून शहरातील नागरिकांची प्रलंबित कामे व वैशीष्ट्यपूर्ण महत्वाच्या कामांची विकास कामांची विकासगंगा कायमस्वरूपी अशीच सुरु राहील व नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील असे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी यावेळी बोलतांना सांगितले.