कृषी

पाडेगाव येथे ऊस बेणे विक्रीचा शुभारंभ

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या मुलभूत ऊस बियाणे विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगरचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांचे हस्ते सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावचे प्रगतशील शेतकरी राहुल भोकरे यांना ऊस बेणेमळ्याची पहिली मोळी देवून बियाणे विक्री व वाटपाला सुरूवात केली.
यावर्षी पाडेगाव संशोधन केंद्राने 25 हेक्टर क्षेत्रावर ऊसाच्या बियाणे मळे तयार केले आहेत. यामुळे ऊसाच्या मुलभूत बियाण्यापासून कारखान्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पायाभूत बेणे मळे तयार करून शेतकर्यांना पुरवठा करता येईल. यामध्ये प्रामुख्याने को 86032, फुले 265, फुले 10001, फुले 09057, को 11015, फुले 11082 या वाणांचे बियाणे उपलब्ध होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये को 86032 आणि फुले 265 या वाणाचे बियाणे मिळेल. डिसेंबर महिन्यात उरलेल्या वाणांचे बियाणे मिळेल.
पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेला आणि सुरू आणि पूर्वहंगामसाठी शिफारस केलेला फुले 11082 हा लवकर तयार होणार वाण आहे. कमी कालावधीमध्ये 10 महिन्यातच साखर तयार होत असल्याने गळीताच्या सुरूवातीला अधिक साखर उतार्यासाठी हा वाण फायदेशीर आहे. चालू वर्षी फुले ऊस 15012 हा वाण शिफारशीत करण्यात येणार असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याची विक्री डिसेंबर पासून सुरू होईल. हा वाण को 86032 पेक्षा अधिक ऊस आणि साखर उतारा देणारा असून फुले 265 पेक्षा 1 युनिटने साखर उतारा मिळणार आहे. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली लागवडीबरोबर खोडव्यासाठी सुध्दा याची शिफारस करण्यात येत आहे.
चालू वर्षी साधारणपणे 1.25 कोटी दोन डोळा टिपरी बियाणे विक्रीस उपलब्ध होणार आहे. याची लागवड एक डोळा पध्दतीने केल्यास 1250 हेक्टरवर करता येईल. त्यानंतर पहिल्या वर्षी हे बियाणे 25 हजार हेक्टर व दुसर्या वर्षी 5 लाख क्षेत्रावर वापरता येईल. अशा प्रकारे दरवर्षी प्रत्येक कारखान्याला 30 टक्के क्षेत्रावर नवीन बेणे वापरता येईल. बेणे बदलामुळे उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते. सर्व साखर कारखाने आणि शेतकर्यांनी पाडेगाव ऊस संशोधन केेंद्राचे बियाणे वापरण्याचे आवाहन डॉ. भरत रासकर, ऊस विशेषज्ञ, ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी केले आहे.
1 गुंठा लागवडीसाठी दोन डोळ्याची 250 टिपरी लागतात. त्याच्या माध्यमातून पुढील वर्षी 1250 ऊस तयार होतील व दोन डोळ्याची 25000 टिपरी उपलब्ध होतील. अशा प्रकारे 1 गुंठे प्लॉटमधून 1 हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येईल. बियाणे ऊसाच्या दोन डोळ्याच्या 1000 टिपरीचा तोडणी आणि भरणीसह विक्रीचा दर रू.1750/- असा आहे. तसेच नवीन वाण फुले 11082 आणि पीडीएन 15012 या वाणाचा 1000 टिपरीचा विक्रीचा दर रू. 5150/- असा आहे. ऊस मोळ्याच्या माध्यामातून बेण्याची विक्री होईल. पाडेगाव ऊस संशोधन केंद्र शेतकरी आणि साखर कारखाने यांच्या प्रगतीकरीता सतत प्रयत्नशील आहे.
या संशोधन केंद्राने प्रसारीत केलेल्या ऊस वाणांच्या बेण्याचा सर्व साखर कारखान्यांनी नवीन लागवडीसाठी उपयोग करावा असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले आहे. या केंद्रातून बियाणे उचलण्यासाठी बियाणे विक्री अधिकारी डॉ. राजेंद्र भिलारे मो. 8275473191 व डॉ. दतात्रय थोरवे मो. 9881644573 यांचेशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. रासकर यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button