कृषी
डॉ. उल्हास सुर्वे बेनिन देशाच्या दौर्याहून परत
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि विद्या विभागातील शास्त्रज्ञ तथा एकात्मिक शेती पध्दती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख कृषि विद्यावेत्ता तथा सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास सुर्वे हे नुकतेच बेनिन या देशातील कृषि परिस्थितीकी या विषयातील कार्यशाळेला उपस्थित राहुन भारतात परतले. ही कार्यशाळा 9 ते 18 सप्टेंबर, 2022 या कालावधीत आफ्रिका खंडातील बेनिन या देशात पार पडली. सदर कार्यशाळेसाठी आठ देशातून 160 शास्त्रज्ञ सहभागी झाले होते.
यात भारत, जर्मनी, बेनिन, इथिओपीया, केनिया, मादागास्कर, बर्किना, तुनेसीया या देशातून शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. या कार्यशाळेच्या दरम्यान सहभागी शास्त्रज्ञांनी कोटानावू तसेच बोहीकॉन येथील विविध संस्था व शेतकर्यांच्या शेतावर भेटी दिल्या. यामध्ये शाश्वत शेती बायोचार तसेच विविध देशातील विस्तार कार्य याविषयी विचार मंथन करण्यात आले. प्रक्षेत्र भेटी दरम्यान फुप्रो बियाणे उत्पादक संघ तसेच कृषि विभागालादेखील भेट दिली. ही कार्यशाळा जर्मनीतील जी.आय.झेड. प्रकल्पांतर्गत आयोजीत करण्यात आली होती.
भारतातील सर्व कृषि विद्यापीठातून डॉ. उल्हास सुर्वे हे एकमेव शास्त्रज्ञ या कार्यशाळेसाठी उपस्थित होते. सदरच्या कार्यशाळेसाठी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील तसेच विद्यापीठाचे तत्कालीन संशोधन संचालक तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी डॉ. उल्हास सुर्वे यांची निवड केली होती. या दौर्यासाठी निवड झाल्याबद्दल डॉ. उल्हास सुर्वे यांचे विद्यापीठाच्या सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात आले.