कृषी
पिक नुकसानीचे व पडलेल्या घरांचे तातडीने पंचनामे करा : आशिष कानवडे
संगमनेर शहर : महिनाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे सध्या अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. पाऊस अद्यापही सुरुच असून शेतक-यांना हाती आलेल्या पिकांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने विनाअट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांनी केली.
संगमनेर, अकोले तालुक्यात विरगाव, देवठाण, गणोरे व इतर भागात पावसाच्या पार्श्वभुमीवर आशिष कानवडे यांनी आज पत्रकारांशी संवाद केला. कानवडे म्हणाले, खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून कमी अधिक स्वरुपात पाऊस सुरु आहे. त्यामुळे बऱ्यापैकी भाजीपाला, ऊस, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक भागातील पिके पाणी साचून सडली आहेत. पावसाचे पाणी वाहील्याने पिकांसह घरांचे, जमिनीचे देखील नुकसान झाले आहे. आता बाजरी, सोयाबीन काढण्याचे काम सुरू आहे तर मात्र ८ दिवसापासून पाऊस उघडीप देत नसल्याने शेतात पाय ठेवणे अशक्य झाले आहे. खर्च होवूनही हाती उत्पन्न येण्याची शक्यता पावसाने दुरावली आहे.
नुकसानीचे वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करून विनाअट नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला शंयावेळी छावा क्रांतिवीर सेना तालुकाध्यक्ष संदिप राऊत, उपतालुकाध्यक्ष सचिन गांजवे, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष नवनाथ राऊत, वि.आघाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मण सातपुते, शहराध्यक्ष मनोहर जाधव आदी उपस्थित होते.