ठळक बातम्या

घाटीत ओटी-पिटी महाविद्यालय सुरु करा – क्रांतीसेना

औरंगाबाद – घाटीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ओटी-पिटी महाविद्यालय तत्काळ सुरु करावे अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. संदीपानजी भुमरे यांच्याकडे करण्यात आली आहे. क्रांतीसेनेचे अध्यक्ष संतोष तांबे पाटील आणि सरचिटणीस नितीन देशमुख यांनी या संदर्भात पालकमंत्री यांची भेट घेऊन सदर निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद येथील घाटी रुग्णालय हे गोर गरिबांसाठी खूप मोठा आधार आहे. या घाटी महाविद्यालयाची अनेक दिवसाची मागणी आहे कि, या ठिकाणी ओटी-पिटी ( ऑक्युपेशनल थेरपी व फिजीओथेरपी ) महाविद्यालय सुरु व्हावे. तत्कालीन वैद्यकीय शिक्षण सचिव यांच्या लेखी सूचनेनुसार घाटी प्रशासनाकडून तसा प्रस्ताव हि सादर केला गेला, त्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे केबिनेट मध्ये या ओटी-पिटी महाविद्यालयाला तत्वतः मंजुरी हि मिळाली होती. फक्त प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा होती. परंतु त्यानंतर परस्थिती जैसे थेच राहिली. जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याचा पाठपुरवठा केला नाही.
२०१०-२०१२ मध्ये याचा पाठपुरवठा प्रशासनाने केला. परंतु फाईल पुढे सरकू शकली नाही. त्यानंतर २०१८ मध्ये डीएमईआर संचालकांच्या शिफारस पत्रासह ३६ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला गेला, तेव्हा हे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हेच होते. तेव्हा त्यांनी अर्थ मंत्रालयाकडे बोट दाखवले. त्यावेळीही औरंगाबाद घाटी कमनशिबी ठरली. २०१९ मध्ये महा आघाडी सरकार आले. त्या तत्कालीन सरकारमध्ये मराठवाड्याचे भूमिपुत्र अमितजी देशमुख हे वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. त्यांनी हि घाटीतील पत्रकार परिषद मध्ये जाहीर केले कि, लवकरच ओटी-पिटी महाविद्यालय सुरु होणार. त्यावेळी आशा निर्माण झाली होती कि, महाविद्यालय सुरु होईल. तेव्हा हि राज्यातील सतरा शासकीय महाविद्यालयामध्ये ओटी-पिटी महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पात हि मंजुरी देण्यात आली. परंतु एकही महाविद्यालय राज्यात सुरु होऊ शकले नाही. परंतु युतीचे सरकार आल्यानंतर विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पदावर येताच काही दिवसातच स्वतःच्या जळगाव जिल्ह्यामध्ये ओटी पिटी ला प्रशासकीय मंजुरी मिळवून घेतली.
औरंगाबाद जिल्हात पंधरा वर्षापासून प्रयत्न करत असताना हे मिळत नाही मात्र राजकीय इच्छा शक्तीच्या जोरावर जळगावला हे महाविद्यालय मिळाले. मराठवाड्याचा विकास अनुशेष असून तो पूर्ण होणार की नाही? असा सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला. याबाबत आपण तातडीने औरंगाबाद घाटी येथील ओटी – पिटी महाविद्यालयाला तत्काळ मंजुरी घेऊन, महाविद्यालय सुरु करावे अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने केली असता लवकरच याबाबत मंत्रीमंडळात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन ना. भुमरे यांनी दिले.

Related Articles

Back to top button