राजकीय
पदवीधर मतदार संघासाठी पदवीधर शेतकर्यांनी नाव नोंदणी करावी – जिल्हाध्यक्ष औताडे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – गेली चाळीस वर्षांपासून पदवीधर मतदार संघासाठी प्रत्येक पंचवार्षिक मध्ये सातत्याने प्रत्येक वेळी पदवीधरांना नाव नोंदणीची वेळ येते. ही बाब लोकशाहीला अयोग्य आहे.
वास्तविक राज्यातील कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी घेतल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव सदर विद्यापीठाने थेट निवडणूक आयोगाकडे कळवून त्या पदवीधरांचा समावेश मतदार यादीत करून घेणे गरजेचे आहे. किंवा एकदा त्या पदवीधर व्यक्तीने आपली नाव नोंदणी केली तर त्यास मतदार यादीत समावेश करून घेतला पाहिजे. परंतु तसें न होता या मतदार संघासाठी प्रत्येक निवणुकीत नव्याने नाव नोंदणी करून नविन मतदार यादी तयार केली जाते. या मध्ये प्रामुख्याने सरकारी कर्मचारी, अधिकारी व शिक्षक हेच मतदार म्हणून प्रत्येक निवडणुकीत नाव नोंदणी करतात. सदर मतदारावर सातत्याने शासनाचे पदाधिकारी व शिक्षण संस्था विश्वस्त याचाच प्रभाव असल्याने सातत्याने राजकीय घराणेशाहीतील लोक निवडून येतात.
आज राज्यात शेतकरी पदवीधर जास्त संख्येने असून सुद्धा मतदार यादीत नाव नोंदणी न केल्यामुळे पदवीधर मतदार संघासाठी मतदान करता येत नाही. त्यामुळे या पदवीधर निवडणुकीसाठी विधान सभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जास्तीत जास्त पदवीधर शेतकऱ्यांनी मतदार नोंदणी अभियानात सहभाग नोंदवावा असे आव्हान अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केले आहे.