ठळक बातम्या
डॉ. प्रदीप इंगोले यांची महात्मा फुले कषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नियुक्ती
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांची नियुक्ती राज्यपाल कार्यालयाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण चार कृषि विद्यापीठे सेवारत असून शेतकरी, शासकीय अधिकारी, कृषि शास्त्रज्ञ, विविध विभाग आणि महत्वाचे म्हणजे राज्यकर्ते, राज्यशासन यांमधील समन्वय अधिक घट्ट करीत कृषि विद्यापीठे समाजाभिमुख करण्यासाठी शेतकरी, शास्त्रज्ञ आणि विधानसभा तथा विधान परिषद आदी विविध प्रवर्गातून सदस्यांची निवड विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर मा. राज्यपाल यांचे मान्यतेने होत असते.
याच अंतर्गत राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील राज्यपाल नियुक्त कार्यकारी परिषद सदस्य आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे माजी कुलगुरू डॉ. बी वेंकटेश्ववरलू यांचा सदस्यत्वाचा कालावधी 29 ऑगस्ट 2022 रोजी संपुष्टात आला असून त्यांचे जागेवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माजी संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या कर्तव्य तत्परतेसाठी आणि सचोटीसाठी सर्वदूर सुप्रसिध्द असलेल्या या कृषि शास्त्रज्ञाच्या नियुक्तीने राहुरी कृषि विद्यापीठ परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी नवनियुक्त विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य डॉ. प्रदीप इंगोले यांचे विद्यापीठ परिवाराचे वतीने हार्दिक अभिनंदन केले आहे.