शिक्षणवारी ज्ञान पंढरी
सद्यस्थितीत चार भाषा विद्यार्थ्यांनी अवगत कराव्यात – पियुष दाल, कोल्हार महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा
राहुरी | बाळकृष्ण भोसले – पद्मभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कोल्हार येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात हिंदी विभागाअंतर्गत १४ सप्टेंबर या हिंदी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया कोल्हार शाखेचे व्यवस्थापक पियुष दाल तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर होते.
हिंदी दिवस साजरे करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांमधील कला, गुण विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. त्यांना त्यांचे प्रत्येक कौशल्य दाखवण्याची संधी दिली जाते. अनुभव हा सर्वात मोठा गुरू आहे. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते, प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात आमंत्रित करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या व्ही. एल. सी. सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी पद्मश्री विखे पाटील व सरस्वती यांच्या प्रतिमेला पियुषजी दाल व महाविद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ आहेर यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाचे प्रमुख प्राध्यापक उत्तमराव येवले यांनी केले.
श्री पियुषजी यांनी आपल्या व्याख्यानात राष्ट्रभाषा हिंदीचे महत्त्व आणि बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. सध्याच्या काळात हिंदी भाषेचे महत्त्व आणि विशेषत: बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी यावर त्यांनी आपले मत मांडले. लिपिक पदांपासून ते शाखा व्यवस्थापकाच्या आणि अर्जापासून बँक स्लिप, धनादेश इत्यादी भरण्यापर्यंत सविस्तर माहिती हिंदी भाषेत देण्यात आली. त्यांनी राष्ट्रभाषा हिंदीचे महत्त्व विशद केले, सोबतच सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांना किमान चार भाषा अवगत करण्याचे त्यांनी सांगितले. तुमची मातृभाषा, तुमची प्रादेशिक भाषा, तुमची राष्ट्रीय भाषा आणि तुमची आंतरराष्ट्रीय भाषा विद्यार्थ्यंना यायलाच पाहिजे. माणसाची खरी ओळख त्याच्या भाषेत असते.
आजच्या जगात भाषेला इतके महत्त्व आहे की तिच्याशिवाय आपले व्यक्तिमत्त्व अपूर्ण आहे. शालेय शिक्षणापासून ते सर्वसामान्यांशी वागण्यापर्यंत, बाजारातील भाषेपासून जाहिरातींच्या भाषेपर्यंत, प्राण्यांच्या भाषेपासून तांत्रिक भाषेपर्यंत. माणसाची भाषा हेच त्याच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे, असे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ.प्रविण तुपे यांनी केले. कु. सानिका देवकर आणि कु. कांचन वडितके या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सुञसंचलन केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.