अहिल्यानगर
गुणवंत शिक्षक व गुणवंत विद्यार्थी हेच खरे समाजाचे आयडॉल -डॉ. संजय कळमकर
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आज विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर काम करण्याची संधी केवळ जिल्हा परिषद शिक्षकांमुळे मिळते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी हे समाजाचे आयडॉल आहेत. आज सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामांचे ओझे शिक्षक खांद्यावर घेऊन देखील गुणवत्तापूर्ण ज्ञानदानाचे कार्य करतात तरी समाजातील काही ठराविक व्यक्ती शिक्षकांच्या कार्यावर अविश्वास दाखवतात ही मोठी शोकांतिका असल्याचे प्रतिपादन गुरुकुलचे सर्वेसर्वा तसेच ज्येष्ठ साहित्यिक व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूर तालुका शिक्षक समिती, गुरुकुल मंडळ, स्वराज्य मंडळ व महिला आघाडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच विविध क्षेत्रात निवड झालेल्या व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएसपी संदीप मिटके, गटशिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी, उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, सुदर्शन शिंदे, स्वराज्य मंडळाचे नेते राजेंद्र ठोकळ, श्रीमती जयश्री झरेकर, भास्करराव नरसाळे, संजय नळे, विठ्ठल वराळे, सैंदाणे सर, संपत सोनवणे, प्रल्हाद साळुंखे, कचेश्वर कठार व इमाम सर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्रीमती सामलेटी मॅडम यांनी सर्व गुणवंतांचे कौतुक केले व मागील दोन वर्षासह यावर्षीचाही जिल्हा शिक्षक पुरस्काराचा मान तीनही महिलांना मिळाला हे श्रीरामपूरचे वैशिष्ट्य असल्याचे स्पष्ट केले. निश्चित आदर्श महिलांचा सन्मान हा कौतुकास्पद असल्याचे आपल्या भाषणात बोलल्या. पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती तरन्नुम खान यांनी गुरुकुल व स्वराज्य या दोन्ही मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक केले. या सन्मान सोहळ्यामुळे आम्हाला भावी आयुष्यात निश्चित काम करण्यासाठी बळ मिळेल असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. त्याचप्रमाणे संतोष वाघमोडे यांनी देखील गुरुकुल स्वराज्य मंडळाने हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध व उत्कृष्टरित्या केल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असे कार्यक्रम राबवल्यामुळे आमच्या पुरस्काराची उंची निश्चित जास्त वाढलेली असल्याचे गौरवोद्गगार काढले. राजेंद्र ठोकळ व संदीप मिटके यांनी गुणवंतांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व आपल्या कार्यातून निश्चित सामाजिक विकास व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष संजय वाघ, श्रीमती मीना निकम, अनिल ओहोळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील गुरुकुल व स्वराज्य मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. शेवटी रवि वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.