अहमदनगर

मडीलगे गावाचा मॉडेल व्हिलेज म्हणून विकास व्हावा – संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख

राहुरी विद्यापीठ : मडीलगे गावातील तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा. गावात फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होऊन मूल्यवर्धनाद्वारे उपपदार्थांची निर्मिती करून उत्पादन ते बाजारपेठ साखळी तयार झाल्यास मडीलगे गाव मॉडेल व्हिलेज म्हणून विकसित होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.
मडीलगे ता. भुदरगड जि. कोल्हापूर या गावातील श्रीराम पाणीपुरवठा संस्थेचे सभासद शेतकऱ्यांचा राहुरी कृषी विद्यापीठ अभ्यास दौऱ्याच्या समाप्तीनंतर झालेल्या कार्यक्रमात डॉ. गडाख मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी या अभ्यास दौऱ्याचे आयोजक महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले, प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन उपस्थित होते. डॉ. शरद गडाख यावेळी पुढे म्हणाले की कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांची कृषी पंढरी म्हणून ओळखले जाते. कृषी विद्यापीठाने आजपर्यंत संशोधित केलेल्या विविध पिकांच्या वाणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. विद्यापीठ संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करून घ्यावा.
यावेळी दत्तात्रेय उगले मार्गदर्शन करताना म्हणाले की सध्याचे युग हे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे युग असून कृषी क्षेत्र ही त्याला अपवाद नाही. विद्यापीठात होत असलेले संशोधन तसेच नवनवीन तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे याचबरोबर विद्यापीठाचा जास्तीत जास्त फायदा शेतकरी बंधूंना कसा होईल हा या अभ्यास दौऱ्याच्या आयोजनाचा मुख्य उद्देश होता. विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रांच्या समस्या सोडविण्याबरोबरच त्यांच्या बळकटीकरणाकडेही लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मडीलगे येथील श्रीराम पाणीपुरवठा संस्थेच्या साठ सभासद शेतकऱ्यांचा एक दिवसीय अभ्यास दौरा यशस्वीपणे पार पडला. यावेळी या अभ्यास दौऱ्यातील शेतकऱ्यांनी विद्यापीठातील ऊस प्रात्यक्षिक, अवजारे विभाग, बेकरी प्रकल्प, रोपवाटिका विभाग, फळपिके प्रकल्प व औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पास भेट देऊन माहिती घेतली. संबंधित प्रकल्पाच्या प्रमुखांनी दिलेल्या उत्कृष्ट माहितीमुळे आम्ही खूप समाधानी झाल्याचे मनोगत या कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. गोकुळ वामन यांनी केले.

Related Articles

Back to top button