अहिल्यानगर
पेमगिरीतील शहागडावर पेमादेवी माता नवरात्रौत्सवास सुरुवात
बाळासाहेब भोर | संगमनेर : तालुक्यातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पेमादेवी मातेचा नवरात्र उत्सव आजपासून मोठ्या उत्साहात सुरु होत आहे. छत्रपती शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहागडावरील हा नवरात्रीचा उत्सव पंचक्रोशीतील भाविकांसाठी मोठी पर्वणीच असते.
सालाबादप्रमाणे यावर्षीही नवरात्री उत्सवात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आलेली आहे. मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळे नवरात्रौत्सवातील सर्व कार्यक्रम स्थगित होते. यावर्षी मात्र नवरात्री उत्सवाची जोरदार तयारी करून अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या वर्षी ” याची देही याची डोळा बघावा ” असा दैदिप्यमान सोहळा पार पडणार आहे.
पेमगिरीचे ग्रामदैवत असलेल्या पेमादेवी मातेच्या या उत्सवात संपूर्ण नऊ दिवस गावातील अन्नदात्यांकडून महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे साडेतीन शक्तीपिठातील एक असलेल्या रेणुकामाता निमदरी येथून पेमगिरीला ज्योत आणल्यानंतर हा उत्सव सुरु होतो. जास्तीत जास्त भाविकांनी या शारदिय नवरात्रौत्सवात सहभागी होऊन जागरण, भजन, कीर्तन, महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती पेमादेवी माता ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली आहे.