गुन्हे वार्ता
शिरसगाव येथे पुन्हा चोर्यांचे सत्र सुरु
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे पुन्हा दोन दिवसानंतर चोरीचे धाडसत्र सुरूच असून सोमवारी पहाटे एक वाजेदरम्यान विजय गायकवाड यांच्या शेजारी राहत असलेले अजय अशोक ढोकळे हे कबड्डी सामने पहावयास गेले असताना व त्यांची पत्नी बाहेरगावी असताना घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पुन्हा ढोकळे यांच्या घरी चोरी करून दहा हजार रोख व घरातील सुमारे पन्नास हजारांच्या जवळपास दागिने चोरून पोबारा केला.
ढोकळे हे रात्री १.१५ वाजता घरी आले तेंव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले. दोन दिवसाआड चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे संतोष परदेशी व तुषार गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली तसेच हाताचे ठसे घेणारे पथक यांनी ठसे ( Finger Print ) घेतले. त्यामुळे चोरटे लवकर सापडतील असा नागरिकांचा विश्वास आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी रवींद्र यादव व आचारी आनंद यांच्या घरी चोर आले व रविंद्र व किरण यांना मारहाण झाली. ही घटना ताजी असताना वारंवार चोऱ्या होतात याची गांभीर्याने पोलिसांनी दखल घ्यावी व गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी सुद्धा आळीपाळीने जागरूक राहून गस्त घालणे गरजेचे आहे.