कृषी

शासनाने किमान 3 हजार रुपये दराने कांदा खरेदी करावा – सुरेशराव लांबे पाटील

यावर्षी साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने 30% ते 40% घट झाली आहे.

राहुरी – आज कांद्याला 800 ते 1000 रूपये प्रती क्विंटल असे सरासरी भाव मिळत असून यामध्ये शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघत नसल्याने शासनाने त्वरित निर्यात चालू करून नाफेड मार्फत किमान 3 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करून यावर्षी बाजार समिती मार्फत विक्री झालेल्या कांद्याला प्रती क्विंटल 500 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षापासुन कोरोना लाॅकडाऊन, अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. त्यातच शासनाची कुठलीच मदत मिळत नसल्याने चालु वर्षी पुर्ण खरीपातील पिके सततच्या पावसामुळे उपळुन गेली आहेत. काही पिकांचे अल्प प्रमाणात पंचनामे करुन तुटपुंजी मदत देऊन शासन शेतकऱ्यांचे समाधान करण्याच्या मार्गावर आहे. संपुर्ण देशामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यातच डिझेल, पेट्रोल, रासायनिक खते, मजुरी, कीटकनाशके यांचे दर खुपच वाढलेले असुन एक एक्कर कांदा लागवडीपासुन ते भुसार स्टाॅक करेपर्यत किमान नव्वद हजार ते एक लाख पर्यत खर्च येतो. दररोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरत असलेला कांद्याचा जीवनावश्यक वस्तुमध्ये समावेश करुन व निर्यात शुल्क वाढवून बाहेर देशामध्ये मागणी असतानाही सरकार कांद्याची निर्यात करत नसुन कायमच कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे.
शेतकर्यांनी कांदा एप्रिल ते मे महिन्यात काढलेला असून भुसा-यामध्ये ठेवून त्याला आज रोजी पाच ते सहा महिने झाले आहे. त्यात 30 ते 40 % घट झालेली असल्याने आज कांद्याला किमान 3 हजार रुपये भाव मिळाला तरच शेतकरी, कष्टकरी बळीराजाला दोन पैसे हातात येईल. शासनाने त्वरित योग्य निर्णय न घेतल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. तसेच बाजार समितीत पदाधिकारी व व्यापार्यांच्या संगनमताने भावात गोलमाल केले जाते. त्याकडे शासनाने लक्ष घालावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा ईशारा तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button