ठळक बातम्या
बांधकाम विभागातील काम वाटप पारदर्शक व्हावे; छावा क्रांतिवीर सेनेची मागणी
संगमनेर शहर : जि.प.अहमदनगर सार्वजनीक बांधकाम विभागाचे काम वाटप संशयाच्या भवऱ्यात सापडले असताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर यांना जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांच्या नेतृत्वाखाली छावा क्रांतिवीर सेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. सदर निवेदनाची एक प्रत टपाला द्वारे अति. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही देण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम वाटप पोर्टल द्वारे गेल्या काही दिवसांपूर्वी सोडत करण्यात आली. पण त्यात कुठेही पारदर्शकपणा दिसून येत नाही. ती कामे १२ जुलै रोजी सुमारे ३७० कामांची सोडत केली जाणार होती, मात्र प्रत्यक्ष अर्जसंख्या कमी असल्याचे कारण देत सोडत रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा अर्ज बोलावण्यात आले. त्यासाठी कामांची यादी प्रसिध्द करण्यात आली. मात्र या यादीतून रहस्यमय रित्या जवळपास १०० कामे वगळली गेली. त्या संदर्भात चौकशी केली असता उत्तरेतून तब्बल ८० कामे ग्रामपंचायतींना वाटल्याची माहिती वृत्तपत्रातून बाहेर आली. त्यामुळे उर्वरित कामांची यादी पुन्हा वेबसाईट वर प्रसिध्द करण्यात आली, मात्र यातसुद्धा गोंधळ निर्माण झाला.
काम वाटपात सु. बे. , मजुर संस्था, खुल्या वर्गातील अभियंत्यांना ३३, ३३, ३४ % काम वाटपाचे नियोजन आहे. मात्र पहिल्या यादीत जी कामे सु. बे. अभियंत्यांसाठी दिली होती ती दुसऱ्या यादीत मजूर संस्था तर कुठे खुल्या अभियंत्यांच्या नावे गेल्याचे निदर्शनास येते. तरी सदर कामे ज्या सु.बे.अभियंत्यांना १२ जुलै रोजी होणाऱ्या सोडतीसाठी अर्ज केले होते त्यांना या सोडतीसाठी कुठल्याही प्रकारची पूर्व सुचना न देता दुसऱ्या सोडती मध्ये ग्राह्य धरले नाही. त्यामुळे हक्काची कामे सु. बे. अभियंत्यांना न मिळता मजुर व खुल्या वर्गाला गेली. यात एकच ठेकेदाराला ११ कामे गेल्याचेही आढळून आले आहे.
या पूर्वी सभागृहात पारदर्शक पणे सोडत केली जात होती. तरी आता सदर कामांना स्थगिती देऊन ती ३७० कामे पुन्हा सभागृहात पारदर्शक पने वाटली जावी व सु.बे. अभियंत्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा छावा क्रांतिवीर सेना जिल्हा परिषद बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. लवकरात लवकर सर्व कामांना स्थगिती देऊन मागणी पुर्ण करावी व अभियंत्याना न्याय देऊन आपल्या विभागाची विश्वासहर्ता वाढवावी अशी विनंती केली आहे.
यावेळी छावा क्रांतिवीर सेना संगमनेर तालुकाध्यक्ष गणेश थोरात, कामगार आघाडीचे संगमनेर तालुकाध्यक्ष संदिप राऊत, संगमनेर तालुका उपाध्यक्ष सचिन गांजवे आदी पदाधिकारी व अभियंते उपस्थित होते.