कृषी
महात्मा फुले कृषि विद्यापीठात अन्न सुरक्षा आणि अधिकार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठात अन्नसुरक्षा आणि अधिकार या विषयावर तज्ञांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हायब्रीड मोड मधील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर परभणी येथील अन्न आणि औषधे प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकाटे, ठाणे येथील अन्न आणि औषधे प्रशासनाचे उपायुक्त दिगंबर भोगावडे तसेच डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण आणि कास्ट प्रकल्पाचे सह समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते. यावेळी भारतीय डेअरी असोसिएशनचे नवनियुक्त उपाध्यक्ष अरुण पाटील हे ऑनलाईन उपस्थित होते.
सेंद्रिय अन्न ग्राहकांचा दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन करताना नारायण सरकटे म्हणाले की, शासनाने सन 2006 मध्ये अन्नसुरक्षा आणि मानक कायदा अंमलात आणला आहे. तसेच सेंद्रिय अन्न नियमन 2017 हा कायदा सन 2018 पासून अंमलात आलेला आहे. सेंद्रिय मालाच्या विपणनासाठी सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम आणि सहभागी हमी प्रणाली याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दिगंबर भोगावडे यांनी भारतातील खाद्यान्न हक्क चळवळ या विषयावर माहिती देताना भारतातील नागरिकांना अन्नप्रणाली विषयी योग्य माहितीची गरज असून त्यांनी सुरक्षित निरोगी आणि शाश्वत पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
इंजि. अरुण पाटील यांनी भारतातील आणि जगातील कुपोषण आणि अन्नाची कमतरता यांची प्रमुख कारणे तसेच अन्नासाठी संघर्ष हवामान बदलाचा परिणाम व विविध संकटासह भरमसाठ किंमती यावर माहिती दिली. डॉ. दिलीप पवार यांनी सध्याच्या पिढीमध्ये आरोग्य विषयी विविध प्रयोग केले जात असल्याचे तसेच अन्नसुरक्षा व निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार पद्धतीची गरज याविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व व्याख्यात्यांची ओळख डॉ. मुकुंद शिंदे यांनी करून दिली. अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण यांनी या व्याख्यानांविषयीची पार्श्वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी केले तर आभार डॉ. उल्हास सुर्वे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून डॉ. नीलिमा कोंडविलकर व इंजि. मोहसीन तांबोळी यांनी काम पाहिले.