अहिल्यानगर

खरे सुख हे भगवंत चिंतन, भक्तीतून प्राप्त होते- ह.भ.प.उद्धव महाराज

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : खरे सुख हे भगवंत चिंतन, भक्तीतून प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प. उद्धव महाराज मांडलिक यांनी शिरसगाव येथे विठ्ठल मंदिरात भास्कर ताके व परिवाराच्या मातोश्री स्व. इंद्रायणी जगन्नाथ ताके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी केले.
ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक महाराज यांनी प्रतिपादन केले की, तुकाराम महाराज म्हणतात जीवनामध्ये समाधान हे भगवंत चिंतनाने, सत्संगामुळे, सत्कार्मामुळे मिळते. दिव्यरूप झालो पवित्र झालो त्या ज्ञानामुळे पवित्रता आल्यामुळे पापांची वासना जळाली आणि पुण्याचा अहंकारही संपला. आपल्या भागात चंद्रभागा व इंद्रायणी हे दोन महत्वाचे शब्द आहेत. इंद्रायणी हे नाव आईला असून आई हे दैवत आहे. दैवताचे दैवताला नाव हे उत्तम आहे. तुम्ही शेतकरी असाल, व्यापारी असाल, उद्योगपती असाल, सुशिक्षित असाल काही हरकत नाही पण आपल्या आई वडिलांचा नावलौकिक वाढवता आला पाहिजे. त्याने जीवन सार्थक बनते. नितिने रीतीने वागण्यात सुख आहे. भक्ती करण्यात सुख आहे. आई वडिलांचा सांभाळ करण्यात सुख आहे. जपताना चांगले विचार जपणे चांगले संस्कार संबंध जपणे व आपल्या घराचा मानपान जपणे हे ज्यांना जमले ते खरे या जीवनात यशस्वी झाले. ते वंदनीय आदरणीय ठरले.
संबंध निर्माण होण्यासाठी व ते टिकण्यासाठी सहागोष्टी महत्वाच्या आहेत. सर्वांचा आदर केला पाहिजे, ऐकून घ्यायला धीर धरला पाहिजे, समजून घ्यायला धीर धरावा लागतो. भीष्माचार्य यांनी सांगितले की श्रीकृष्णाची अग्रपूजा करा ते वंदनीय आहेत. पूजनीय आहेत, ज्ञानाने गुणाने, परमार्थाने ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. जे नितीमत्ता सोडून वागत आहे वडिलधाऱ्याचे अपमान करतात त्यांची अधोगती झाली आहे. जे माय भगिनीचा छळ करतात जे गरीबांचा घास घेतात त्यांची अधोगती झाली आहे. हा धर्मशास्त्राचा सारांश आहे. रामायणाचा उपदेश हाच आहे. आज या जगामध्ये वडीलधारी माणसे शहाणी सज्जन माणसे आपल्या जीवनाचे रहस्य समजावून सांगताना बाबांनो सुविधेच्या मागे लागून अनीतीने वागण्यापेक्षा खऱ्या सुखाच्या मागे लागा आणि नीतीयुक्त, भक्तियुक्त, प्रीतियुक्त जीवन जगा. संसारामध्ये प्रेमाची आवश्यकता आहे. व्यवहारात नीतीची आवश्यकता आहे व परमार्थामध्ये भक्तीची आवश्यकता आहे.
हा त्रिवेणी संगम जीवनात असेल तर माणसाला कशाची दुसरी गरज पडत नाही. त्यांचे जीवन मोठे आनंदी समाधानी असते. जगतगुरू तुकाराम महाराज यांचे जीवन ह्यामुळे समाधानी होते. त्यांचे फक्त नामस्मरण केले तरी आपल्याला पुण्य मिळते. आनंद मिळतो. एकदा तुकोबारायांना देहू गावाबाहेर कुटुंबासह काढले त्यांच्या भजनांचा त्रास व्हायचा, ते दुसरीकडे गेले झोपडी बांधून भजन कीर्तन केले. तेंव्हाही त्यांना त्रास दिला ज्या धर्माचा झेंडा खांद्यावर घेऊन व खरा धर्म समाजाला सांगण्याचे काम, अंधश्रद्धारहित झाले, स्वार्थरहित कर्म आता व्यक्ती केन्द्री असण्यापेक्षा विचारांमुळे आधारलेला धर्म सांगण्याचे काम जगतगुरू तुकाराम महाराज करू लागले.
संत वचनाचे शास्त्र वचनाचे अर्थ समजावून घेत असताना त्याचा लक्षार्थ समजून घ्यावा. विचार हा परमार्थाला समर्पित केला. चिंतनात समर्पित होते. तुकाराम महाराज हे अध्यात्माची, लोकप्रबोधानाची समर्पित केलेले महात्मे आहेत. आपण हरिनामाचे नामस्मरण करतो, मानवी जीवनामध्ये अत्यंत चांगले सकारात्मक चिंतन करीत राहिलो तर चित्त समाधान प्राप्त होते. भगवंत चिंतन करणे म्हणजे सकारात्मक चिंतन करणे, भगवंतासारखे सत्य व सकारात्मक या सारखे जगात दुसरे काय? खरे सुख हे आपल्याला भगवंत चिंतनातून भगवत भक्तीतून प्राप्त होते.
यावेळी ह.भ.प.कांडेकर महाराज, गणेशराव मुदगुले, किशोर पाटील, साईनाथ गवारे, अशोक पवार, सुभाषराव गवारे आदी अनेक मान्यवर, नातेवाईक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button