गुन्हे वार्ता
ढोरकीनच्या बँकेवर दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी
विलास लाटे | पैठण : तालुक्यातील ढोरकीन येथील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा टाकण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न अखेर अयशस्वी ठरला. शनिवारी सकाळी बँकेचे अधिकारी व कर्मचारी जेंव्हा नित्याप्रमाने बँकेत आले तेंव्हा हि घटणा उघडकीस आली.
ढोरकीन येथील बालानगर फाट्यावर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. या शाखेत ढोरकीनसह परिसरातील अनेक शेतकरी, मजूर, नोकरदार व व्यावसायिकांचे खाते आहे. दरोडेखोरांनी शुक्रवारी मध्यरात्री बँकेतील २३ लाख रुपयांच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला मात्र बँकेच्या मुख्य चॅनलगेटचे लॉक तोडण्यात दीड तासाचे शर्थीचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. ही सर्व घटना सिसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, स्थानीक गुन्हे शाखेचे अधिकारी रेंगे व बिट जमादार कर्तारसिंग सिंघल आदींनी घटणास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. दरम्यान पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांचे पथक रात्री कार्यक्षेत्रातील औरंगाबाद – पैठण रस्त्यावर गस्त घालत असतात. याच वेळी हे पथक ढोरकीनच्या बँक परीसरात आले असल्याची चाहूल लागताच दरोडेखोरांनी पळ काढला असावा असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगीतले.