ठळक बातम्या
८ ऑगस्ट रोजी दिल्लीत पेन्शनधारकांचे देशव्यापी सत्याग्रह आंदोलन
श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : येत्या ऑगस्ट महिन्यात ८ ऑगस्ट रोजी इपीएस पेन्शन धारकांच्या प्रश्नी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम भारत संघटक सचिव सुभाष पोखरकर यांनी श्रीरामपूर येथे बैठकीत दिली.
एक महिन्याच्या आत केंद्र सरकारने इपीएस ९५ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ केली नाही तर १ ऑगस्टपासून इपीएफओच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयासमोर शेकडो पेन्शनर साखळी उपोषणास बसणार आहेत. दिनांक ७ ऑगस्टपासून तेथे आमरण उपोषण सुरु होणार आहे. ८ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये दोन लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सत्याग्रह / रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अनेक आंदोलने केल्यानंतर देशातून सर्व ठिकाणी पेन्शनधारकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या प्रश्नी लक्ष घालावे म्हणून खासदार यांचे मार्फत पाठविलेल्या निवेदनावर महिला पुरुष कामगारांनी स्वत:च्या रक्ताचे आंगठे देऊन अनोखे आंदोलन केले.
देशात औद्योगिक सार्वजनिक, सहकारी व इतर खाजगी उद्योग क्षेत्रात ६७ लाख कामगारांनी इपीएस फंडात दरमहा ४१७, ५४१, १२५० रु असे अंशदान दिले आहे. त्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यावर तुटपुंजे असे पेन्शन मिळत आहे. त्यात जीवन जगणे मुश्कील झाले आहे. पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय संघर्ष समिती ६ वर्षापासून लढा देत आहे. खा.हेमा मालिनी यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेबरोबर दोन वेळा सविस्तर चर्चा होऊन समितीने पेन्शन वाढ कशी योग्य आहे हे पटवून दिले. त्यावर पंतप्रधान यांनी पेन्शनवाढीचे निर्देश मंत्र्यांना दिले. त्यानुसार बैठक होऊन त्यांनी देखील वाढ देण्यास हरकत नसल्याचे सांगितले.
अर्थ सचिव व मुख्य प्रोव्हीडेट कमिशनर यांचेशी शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. दरमहा रु ७५००/-अधिक महागाई भत्ता अशी पेशन मिळावी. वृद्ध पतीपत्नीला मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी आदी मागण्या आहेत. जिल्ह्यातून एक हजार पेन्शनधारक सहभागी होणार आहेत. या आंदोलनात जास्तीत जास्त पेन्शनरानी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांनी केले आहे. आंदोलनासाठी लवकर रेल्वेत जागा मिळण्यासाठी त्वरित आरक्षण करून घ्यावे. ७ ऑगस्टला दिल्लीत पोहोचणे आवश्यक आहे. दररोज सकाळी गोवा, दुपारी कर्नाटक, व रात्री झेलम एक्स्प्रेस आहे. दि ६ रोजी शिर्डीहून कालका एक्स्प्रेस, व सुवर्णजयंती एक्स्प्रेस आहे. त्याप्रमाणे आरक्षण घ्यावे.
अहमदनगर जिल्ह्यातून १४५ पेन्शनरानी रेल्वे आरक्षण केले असल्याने ही संख्या अतिशय कमी आहे. कमीतकमी ४०० पेन्शन धारक या जिल्ह्यातून जाणे आवश्यक आहे. हे शेवटचे आंदोलन ठरण्यासाठी भव्य आंदोलन होणे गरजेचे आहे. असे आवाहन सुभाषराव पोखरकर, संपतराव समिंदर, एस के सय्यद, नारायण होन, दशरथ पवार, भगवंत वाळके, बापूराव बहिरट, संजय मुनोत, शिवाजी बंगाळ, राधाकृष्ण धुमाळ, भीमराज भिसे, सुकदेव आहेर, साहेबराव वाघ आदींनी केले आहे.