महाराष्ट्र
कोरोना विधवांना एक लाख रुपयांची मदत मिळावी – आप्पासाहेब ढुस
देवळाली प्रवरा : कोरोनामुळे विधवा झालेल्या राज्यातील सर्व महिलांना राज्य सरकारने किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत करावी असे पत्र आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांना ई-मेल द्वारे पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र व राज्य सरकार दोघे मिळून आपत्ती व्यवस्थापन निधीतून कोरोनात मृत्यू झालेल्या कुटुंबाना फक्त ५०,००० रु निधी देत आहे. ही अतिशय अत्यल्प व तुटपुंजी रक्कम असून कोविड काळात एका इंजेक्शन ला या कुटुंबांनी ५०,००० रु मोजले आहेत व हॉस्पिटलच्या लाखोंच्या बिलामुळे आज अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठीही आर्थिक मदत गरजेची आहे.
तेव्हा या कुटुंबातील विधवा महिलांना मोठ्या आर्थिक मदतीची गरज असलेने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील कोरोनात विधवा झालेल्या महिलांना केंद्र व राज्य सरकार या दोघांनी मिळून फक्त ५०,००० रु न देता केंद्र व राज्य सरकार या दोघांनीही स्वतंत्र एक लाख रुपये द्यावेत. दिवाळीच्या निमित्ताने या भगिनींना आपण भाऊ म्हणून मदत कराल असा विश्वासही ढुस यांनी पत्रात व्यक्त केला आहे. ही मदत लवकरात लवकर म्हणजे दिवाळीपूर्वी या महिलांना मिळणे कामी संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती ढुस यांनी पत्राचे शेवटी केली आहे.