पेन्शन वाढीसाठी देशभरातील निवृत्त कर्मचाऱ्यांचे नवी दिल्लीतील भव्य आंदोलन
शिरसगाव प्रतिनिधी, नवी दिल्ली | देशातील निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येत जंतर-मंतर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन केले. देशभरातील एस.टी. महामंडळ, वीज महामंडळ, शेती महामंडळ, सहकारी बँका व इतर औद्योगिक-सहकारी क्षेत्रातील हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. अल्प पेन्शनमध्ये जगण्याची मजबुरी दूर व्हावी, यासाठी हे ऐतिहासिक आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात दहा हजारांहून अधिक निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. फक्त ₹1,000 ते ₹1,500 या अत्यंत अल्प पेन्शनमध्ये दिवस काढणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गेल्या 10-12 वर्षांपासून अनेक वेळा मागण्या केल्या, आंदोलने केली; मात्र अजूनही न्याय मिळालेला नाही.
यावेळी पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी सांगितले की, “ही केवळ मागणी नव्हे, तर आमचा अधिकार आहे. आम्ही भीक मागत नाही, सन्मानाने जगण्यासाठी लढा देत आहोत.”
या आंदोलनास पिंपरी चिंचवडचे खासदार श्रीरंग बारणे, बाराबंकीचे खासदार तनुज पुनिया व राजस्थानचे खासदार अमरा राम यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. “हा लढा केवळ पेन्शनसाठी नव्हे, तर न्यायासाठी आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे त्यांनी जाहीर केले.
यावेळी प्रांताध्यक्ष एस. एन. आंबेकर, प्रांत संघटक अजितकुमार घाडगे, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र देवीसिंग जाधव, कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, सचिव सुधीर चांडगे, उपाध्यक्ष भगवंत वाळके, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, शिर्डी प्रमुख डी. एस. पवार, समन्वयक डी. एम. पाटील, तसेच इंद्रसिंग राजपूत, अरविंद भारंबे, अर्जुन जाधव, सुलेमान शेख, अशोक जोंधळे, सुरेश कटारिया यांसह विविध राज्यांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले की, “ही लढाई आपण जिंकणारच आहोत. जोपर्यंत पेन्शन वाढ होत नाही, तोपर्यंत लढा सुरू राहणार. वेळ आली तर आमरण उपोषणाची तयारी आहे.”
या आंदोलनात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, ओरिसा, प. बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड, आसाम, मणिपूर आदी राज्यांतील प्रतिनिधींनी जोमाने सहभाग घेतला.



