कृषी
आता शेतकरी आत्महत्या करणार नाहीत : प्राचार्य तुळशीराम शेळके
श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : एमसीएल अंतर्गत जीतशार प्रोड्युसर कंपनी लिमिटेड बायो -सीएनजी प्रकल्पाची सुरुवात खानापूर येथे अल्पावधीतच सुरु करीत असल्यामुळे शेतकरी सुखी होणार आहे. गावातच 2000 रोजगार निर्मिती आणि गिन्नी गवतापासून इंधन निर्मिती मुळे भरपूर आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असे मत ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य तुळशीराम इराप्पा शेळके यांनी व्यक्त केले.
येथील एमसीएल अंतर्गत जीतशार प्रोड्युसर कंपनी लिमिटेडतर्फे प्रवरा हौसिंग सोसायटी कंपनी सभागृहात आयोजित जागतिक जैविक इंधन दिन(वर्ल्ड बायोफ्युएल डे )साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शेळके बोलत होते. प्रमुख वक्ते प्रा.डॉ. बबनराव आदिक, प्रमुख पाहुणे डॉ.बाबुराव उपाध्ये आदीसह ग्रामो उद्दोजक उपस्थित होते. संयोजक संदीप दातीर यांनी स्वागत प्रास्ताविक करून पाहुण्यांचा शाल, बुके देऊन सन्मान केला. यावेळी वळदगावचे ॲड सुभाष जंगले, सराला येथील प्रशांत औताडे, कुरणपूरचे शुभम चिंधे, सचिन वडितके, टाकळीभानचे विकास सपकाळ, नायगावचे रोहिदास कांडे, योगेश बुचडे, माळेवाडीचे महेश वमने, भोकरचे धनंजय नाईक, खोकरचे बाबासाहेब पटारे, घुमनदेवचे बाळासाहेब बनकर निमगाव -खैरीचे रवींद्र काळे, धनंजय काळे आदीसह पियुष पाटोळे, सागर राजभोज उपस्थित होते. प्राचार्य शेळके आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, एखादा “डे “साजरा करणे म्हणजे त्या पवित्र दिवसाचा तो श्रद्धेचा आणि प्रेरणादायी सण असतो. गाव आणि शेतकरी सुखाचा हा सणच आपण जागतिक भावनेने साजरा करीत आहोत, असे सांगून एमसीएल प्रकल्पाचे प्रमुख शाम शिवाजी घोलप आणि रंजीत दातीर यांच्या सेवाशील कार्याचे कौतुक केले.प्रमुख पाहुणे डॉ.बाबुराव उपाध्ये म्हणाले,आपले जग सुखी झाले पाहिजे, आपले आरोग्य उत्तम राहिले पाहिजे,पूर्वीचे पाणी, अन्न, घर, वागणं अगदी साधे पण स्वच्छ, निरोगी होतेे. आता विषारी आणि रोगट जीवन झाले आहे, ते बदलायचे असेल तर बायो -सीएनजी, बायो -पीएनजी, सेंद्रिय खत निर्मिती असे प्रकल्प गावोगावी उभे राहत आहेत त्यात सहभागी होऊन आरोग्य आणि समृद्धी आणू असे सांगितले.प्रमुख वक्ते प्रा.डॉ.बबनराव आदिक म्हणाले, रासायनिक खते आणि अज्ञान यामुळे आपली शेती, माती,हवा,वातावरण, पाणी आणि आकाशही नासले आहे, आता आपणच ज्ञानी होऊ, आपले आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण थांबवू, आपली शेती विषमुक्त करू, महामारी, महापूर, अवर्षण,रोगराई घालवू आपले गाव स्वयंपूर्ण करू त्यासाठी शाम शिवाजी घोलप हे श्रीकृष्ण होऊन हे कार्य करीत आहेत, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष रंजीत दातीर यांना बळ दिले तर आपले सर्व प्रश्न सुटतील, आपले सुख आपल्या हाती आहे.पेट्रोल, डिझेल, गॅस अन्य इंधन येथेच निर्माण होत आहे.आपले आणि देशाचे अर्थकारण संपन्न करू. जागतिक स्तरावर आता माणूस जागा झाला आहे, ही रोगराई नष्ट करू नाहीतर आपण नष्ट होऊ त्यासाठी शेतकरीवर्ग सजग झाला पाहिजे, आपले फार शोषण झाले आहे, होत आहे, या सतकार्यात जो सहभागी होईल त्याला उज्जवल भविष्यकाळ असल्याचे मत डॉ. बबनराव आदिक यांनी विविध उदाहरणातून पटवून दिले.राजेंद्र येळवंडे यांनी आभार मानले.