कृषी
राहुरीत रानभाजी वनभोजन महोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद
राहुरी प्रतिनिधी : कृषी विभागाने आयोजित केलेल्या रान भाजी वनभोजन महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असून त्यांचे मार्केटिंग होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्रांताधिकारी दयानंद जगताप यांनी व्यक्त केले.
राहुरीतील ट्राय फार्म बारागाव नांदूर रोड येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने रानभाज्या वन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रकल्प उपसंचालक आत्मा आर के गायकवाड, उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार फसीउद्दिन शेख आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी जगताप म्हणाले की, यातुन शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम स्तुत्य असून जास्तीत जास्त लोकांना याबाबत माहिती पोहोचवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना तहसीलदार फसीउद्दिन शेख म्हणाले की, वन भाज्या महोत्सवामुळे विविध प्रकारच्या नैसर्गिक रित्या उगवलेल्या भाज्या पाहण्याची संधी यानिमित्ताने शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. भाज्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यातून आरोग्य उंचावण्यास मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी महिला बचत गटाचे प्रतिनिधी कालेकर देखील उपस्थित होते. त्यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राहुरी तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी केले. त्यात त्यांनी पुढील वर्षी सात दिवसांचा महोत्सव ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली.
व्हिडिओ : रानभाजी वनभोजन महोत्सव
यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले यांचे भाषण झाले. त्यांनी विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीचे महत्त्व विशद केले. सदर कार्यक्रमांमध्ये शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आठ ते नऊ प्रकारच्या रानभाजीच्या पाककृती करण्यात आल्या. या रानभाज्यांचे 150 नागरिकांनी सेवन केलं. रान भाजी महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राहुरी तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले.