महाराष्ट्र

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे ” ग्रंथालय चळवळ टिकविण्यासाठी सक्षम करण्याची मागणी”

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांना सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न सोडविण्याची मागणीचे निवेदन देताना राज्य ग्रंथालय संघाचे संभाजी पवार समवेत अमोल इथापे आदी मान्यवर.
अहमदनगर/ जावेद शेख : ग्रंथालय चळवळीसमोर आज अनेक समस्या असून ग्रंथालये व ग्रंथालयीन कर्मचा-यांचे प्रश्न सोडवून ग्रंथालय चळवळ सक्षम करावी अशी मागणी ‘राज्य ग्रंथालय संघा’चे सदस्य संभाजी पवार यांनी केली.
सार्वजनिक ग्रंथालयाच्या समस्यासंदर्भात संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथालय प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांची  भेट घेवून ग्रंथालयीन प्रश्नासंबधी सविस्तर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी  ग्रंथालयांना अनुदानाचा पहिला टप्पा देण्याचा शासन निर्णय जारी केल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांचा राज्यातील १२१४४ ग्रंथालये व २१६१५ कर्मचा-यांच्या वतीने संभाजी पवार यांनी त्यांचे ग्रंथभेट देवून आभार मानले.
सार्वजनिक ग्रंथालयाकडे निवृत्तांच्या जोडीला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीबरोबरच, स्पर्धा परीक्षांचा  अभ्यास करणा-या विद्यार्थींचा कल वाढत आहे. पण तुटपुंजे अनुदान आणि तेही वेळेत नाही. या वर्षी तर ग्रंथालयीन कर्मचा-यांची दिवाळीसुध्दा अंधारातच गेली. ग्रंथालयाचे अनुदान वाढ, दर्जाबदल, नवीन मान्यता, कर्मचा-यांना किमान जगण्यायोग्य वेतन व इतर प्रश्न सोडविण्याची मागणी मंत्री उदय सामंत यांच्याकडे संभाजी पवार, अमोल इथापे यांनी केली.
ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यापासून थेट भटक्या विमुक्तांच्या पालावर वाचनसंस्कृती रुजविण्याचे कार्य करणा-या श्री. कदमराव पवार सार्वजनिक वाचनालय व शतकोत्तरी अहमदनगर जिल्हा वाचनालयाची माहीती मंत्री महोदयांना यावेळी देण्यात आली. शिष्टमंडळात युवाग्राम संस्था,श्री.कदमराव पवार सार्वजनिक वाचनालय व जिल्ह्यातील सार्वजानिक ग्रंथालय प्रतिनिधींचा सहभाग होता.

Related Articles

Back to top button