कृषी

पाडेगावने देशाला ऊस बेणे पुरवठा करणारे केंद्र म्हणुन नावलौकीक मिळवावा : कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीपाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राने आजपर्यंत ऊस संशोधनात भरीव असे योगदान दिले आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील साखर कारखानदार व शेतकरी या दोघांचाही आर्थिक स्तर उंचावला आहे. या संशोधन केंद्रास आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट, मांजरी यांच्या प्रमाणेच एक रुपया प्रति टन या प्रमाणे निधी देण्यात यावा. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने महाराष्ट्रच नव्हे तर देशाला ऊस बेणे पुरवठा करणारे केंद्र म्हणुन नावलौकीक मिळवावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. 

    कुलगुरु डॉ. पाटील यांचा पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राच्या आपल्या पहिल्या भेटी प्रसंगी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सभासद प्रशांत शेंडे, पाडेगावच्या सरपंच सौ. स्मिता खरात, कृषि पदविधर संघटनेचे सतीश शिंदे यांनी सत्कार केला. या सत्कारानंतर मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. रासकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की या संशोधन केंद्राने गेल्या 88 वर्षात प्रामुख्याने उसाचे 14 वाण प्रसारीत केले असून राज्यातील 90 टक्के क्षेत्र या वाणांखाली आहे. आतापर्यंत केंद्राने ऊस उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञानाच्या 93 शिफारशी दिलेल्या आहेत. या तंत्रज्ञान शिफारशींमध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे, पाचट आणि हिरवळीच्या खतांचा वापर करणे, ठिबक व अन्नद्रव्य व्यवस्थापन, ऊस लागवड तंत्रज्ञान या शिफारशी महत्वपुर्ण आहेत. यावेळी प्रशांत शेंडे, सौ. स्मिता खरात यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना पाडेगाव ऊस संशोधन केंद्राबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमानंतर कुलगुरुंनी प्रक्षेत्रावरील उसाचे विविध प्रयोग, नविन जाती पैदास आणि बिजोत्पादन प्लॉटचे पाहणी करुन समाधान व्यक्त केले. यावेळी ऊस संशोधन केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी तर आभार डॉ. सुरेश उबाळे यांनी मानले.

Related Articles

Back to top button