कृषी

डॉ.आनंद सोळंके केंद्राई जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत

राहुरी विद्यापीठ : निफाड येथील केंद्राई कृषि व ग्रामविकास संस्थेचा सन 2021 या वर्षीचा केंद्राई भूषण पुरस्कार महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील विभाग प्रमुख, कृषि विद्या विभाग व प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे), बियाणे विभाग, या पदावर कार्यरत असलेले डॉ. आनंद विठ्ठलराव सोळंके यांना लासलगाव येथे संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गा तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते हंसराज वडघुले, निफाड सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी ढेपले, कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सचिन होळकर, किसान क्रांती सेनेचे योगेश रायते, कार्ड्स संस्थाध्यक्ष वसंत शिंदे, संकल्प सेवाभावी संस्थाध्यक्ष संजय आहेर आदींसह मान्यवर उपस्थित होते. 
 डॉ. आनंद सोळंके यांनी विद्यापीठाच्या विविध पदांवर कार्यरत असतांना समर्पीतपणे शेतकर्यांची सेवा केली आहे. शेतकर्यांचे जीवनमान उंचवावे, आर्थिक सबलीकरण व्हावे यासाठी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग डॉ. सोळंके यांनी राबविले. ऊस + बटाटा आंतरपिकाची शिफारस त्यांनी शेतकर्यांमध्ये यशस्वी केली. उसामध्ये फुले 10001 आणि फुले 09057 यासारखे अधिक उत्पादनक्षम वाण विकसीत केले. बियाणे विभागाकडे कार्यरत असतांना उद्दीष्ठांपेक्षा जास्त बिजोत्पादन करुन विद्यापीठाचे महसुली उत्पन्न वाढविले. शेतकरी उत्पादक कंपन्या/खाजगी बियाणे कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करुन त्यांना मुलभूत बियाण्यांचा पुरवठा करुन बिजोत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले. विद्यापीठाचे माळरान, नापीक क्षेत्र वहिताखाली आणुन आंबा फळबाग लागवड करण्यासारखे महत्वकांक्षी प्रकल्प सध्या ते राबवत आहेत. जलसिंचन व्यवस्थापनामध्ये त्यांनी शिफारशी दिलेल्या आहेत. यापूर्वी डॉ. सोळंके यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. केंद्राई जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button