छत्रपती संभाजीनगर

ढाकेफळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत अतिवृष्टीचे ८४ लाख ६९ हजारचे अनुदान जमा

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मंगळवार,९ रोजी अनुदान जमा झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला होता. हिरवीगार झालेली पिके पिवळी पडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके व फळबागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान दिवाळी अगोदर खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र दिवाळी होऊन चार ते पाच दिवस झाले तरीही अनुदान जमा झाले नव्हते. अनुदान जमा होऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र महसूल विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अनुदान जमा होण्यास उशीर झाला. अनुदान शेतकऱ्यांना त्वरित मिळाले पाहिजे. यासाठी पैठण तालुक्यातील ढाकेफळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी शाखेतील कर्मचाऱ्यांनी अतिशय तत्परतेने पाठपुरावा करून आज दि.९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात ८४ लाख ६९ हजार रूपयाचे अनुदान जमा केले आहे. यामध्ये ढाकेफळ, अमरापूर वाघुंडी, ७४ जळगाव, खाम जळगाव, शहापूर मानेगाव, औरंगपूर बुट्टेवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे अनुदान जमा करण्यात आल्याची माहिती बँकेतील कर्मचारी यांनी दिली. पैठण तालुक्यात सर्वात अगोदर ढोरकीन महसुली मंडळातील येणाऱ्या वरील गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे शंभर टक्के अनुदान जमा करण्यात आले. एकही गाव शिल्लक राहिले नसल्याची माहिती राजेंद्र मोरे यांनी दिली. अनुदान जमा करण्यासाठी ढाकेफळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा अधिकारी बी.एन.घेगडे, राजेंद्र मोरेे, एस.एच. पठारे, यु.पी.सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button