कृषी

हवामान बदलानुसार पीक पध्दतीची आखणी करणे गरजेचे : कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

हवामान बदल व पीक पध्दती शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्रात मार्गदर्शन करताना राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी जी पाटील

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : मानवाने विकासाच्या नावाखाली औद्योगिकरण करतांना नैसर्गिक साधन संपत्तीचा अमर्याद वापर केला. त्यातुन झालेली तापमान वाढ पर्यायाने हवामानातील बदलाला कारणीभुत ठरली. यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. गारपीट तसेच वादळांचे प्रमाण यात वाढ झाली. आजपर्यंत न दिसलेल्या किडी व रोगांचे प्रमाण वाढून या सर्वांचा शेतीवर विपरीत परिणाम झाला. या सगळ्या पार्श्वभुमीवर शेतकर्यांनी हवामान बदलानुसार पीक पध्दतीची आखणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि ग्रामिण विकास व शिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदल व पीक पध्दती (ऑनलाईन) शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्राचे आयोजन विस्तार शिक्षण विभाग, कृषि महाविद्यालय, पुणे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. पी.जी. पाटील प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुजरात येथील गांधीनगरच्या कामधेनु विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एम.सी. वार्ष्णेय होते. यावेळी नवी दिल्ली येथील शिक्षण व संशोधन ग्रोथ या केंद्राचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टीट्युट, पुणेचे अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडीया, कार्यक्रमाचे निमंत्रक कृषि महाविद्यालय, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनिल मासाळकर, संयोजक विभाग प्रमुख, कृषि अभियांत्रिकी विभाग व प्रमुख संशोधक, कास्ट प्रकल्प डॉ. सुनिल गोरंटीवार, सहसंयोजक विभाग प्रमुख (कृषि हवामान), कृषि महाविद्यालय, पुणेचे डॉ. जयवंत जाधव, ग्रामीण विकास व शिक्षण संस्था, पुणेचे उपाध्यक्ष चिटणीस, नाडगोडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
     डॉ. पाटील आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की विद्यापीठातील शास्त्रज्ञांना कमी कालावधीचे तसेच पाण्याचा ताण सहन करणारे पिकांचे वाण संशोधीत करावे लागतील जेणेकरुन शेतीवर होणार्या वातावरणातील बदलाच्या परिणामांना शेतकरी समर्थपणे तोंड देईल. विद्यापीठातील कास्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकर्यांना फायदा होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वार्ष्णेय हवामानातील बदल या विषयावर बोलतांना म्हणाले की जंगलाला लागणार्या आगी, थर्मल पॉवर स्टेशन्स, अमर्याद वृक्षतोड, उसाचे पाचट तसेच गव्हाचे, तुरीचे काड जाळणे यामुळे वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. याचा प्रतिकूल परिणाम शेतीवर होऊन तापमानात वाढ होत आहे. तापमान वाढल्यामुळे हिमनग वितळून समुद्राची पाणीपातळी वाढत आहे. वातावरणातील बदलामुळे ढगफुटीसारख्या घटना घडून जमिनीच्या पृष्ठभागावरील मौल्यवान माती वाहुन गेल्यामुळे शेतकर्यांचे कधीही भरुन न येण्यासारखे नुकसान होत आहे. यावर शास्त्रज्ञांनी योग्य ते उपाय शोधण्याची गरज त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. दुसरे प्रमुख पाहुणे डॉ. चोरडीया आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की शालेय शिक्षणापासून विद्यार्थ्यांना शेती हा विषय शिकवीला पाहिजे तरच त्यांच्यामध्ये शेतीविषयी आवड निर्माण होईल. शेतकरी वा त्यांच्या मुलांना शेती करतांना अभिमान वाटला पाहिजे अशा प्रकारचे वातावरण तयार व्हायला हवे. शेतकर्यांनी आपल्या शेतीमध्ये स्वयंचलीत यांत्रिकीकरण, तापमान नियंत्रीत करुन केली जाणारी काटेकोर शेती, हवामानातील बदलानुसार पीक पध्दतीत बदल हे बदल घडवावे लागतील. विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेत असतांनाच स्वतःचे स्टार्टअप सुरु करुन पदवी संपल्यानंतर एखाद्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची निर्मिती सुरु करता येईल असे मार्गदर्शन संशोधन संस्थानकडून होणे गरजेचे आहे. 
      यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. जयवंत जाधव यांनी हवामान बदल व पीक पध्दत तसचे डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी सुर्यवंशी यांनी तर आभार डॉ. सुनिल मासाळकर व नाडगोडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. शुभांगी घाडगे, इंजि. मोहसीन तांबोळी यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणुन काम पाहिले. या चर्चासत्रासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 100 पेक्षा जास्त शेतकर्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला.

Related Articles

Back to top button