अहिल्यानगर
क्रांतीदिनी होणार कारखानदारांविरोधात क्रांतीचा एल्गार..!
स्वतंत्र क्रांतीकारी लोकसेवा संघाचे राजेंद्र म्हस्के, अनिल ठवाळ, सुभाष दरेकर आदींच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
श्रीगोंदा प्रतिनिधी : तालुक्यातील चारही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे एफआरपी प्रमाणे पेमेंट अदा केलेले नाही. तरी ते तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. याकरिता स्वतंत्र क्रांतिकारी लोकसेवा संघाच्यावतीने श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
स्वतंत्र क्रांतीकारी लोकसेवा संघाच्या मुख्य प्रवर्तकांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील कारखानदारांनी एफआरपीच्या राहिलेल्या रक्कमेवर शेतकऱ्यांना व्याज द्यावे. सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखाना यांनी नुकतेच विशेष सभेमध्ये सभासदांची शेअर्सची रक्कम वाढवली आहे. तरी ही वाढीव रक्कम सभासदांकडून न घेता कारखान्याकडे सभासदांच्या असणाऱ्या ठेवींवरील व्याजातून कपात करण्यात यावी. नागवडे कारखाना यांनी २०० रुपये प्रमाणे पेमेंट काढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रपंच्याशी खेळत असलेला खेळ थांबवावा व उर्वरित राहिलेले पेमेंट तातडीने जमा करावे. कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना पिंपळगाव पिसा या कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागील हंगामातील ऊसबील थकित आहे, तरी ते तातडीने देण्यात यावे. साईकृपा साखर कारखाना हिरडगाव यांनी ऊस वाहतूक, ऊस उत्पादकांचे ऊस बील व कामगारांचे थकीत पगार त्वरित जमा करावे. तसेच श्रीगोंदा तालुक्यातील साखर कारखान्यांनी कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आरोग्य विमा उतरावा, तसेच मागासवर्गीय समाजातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी साखर कारखान्याचा सभासद मोफत करण्यात यावे,या सर्व मागण्यांसंदर्भात साखर कारखानदारांनी वरील प्रश्न मार्गी न लावल्यास, एफआरपीप्रमाणे पेमेंट त्वरित न दिल्यास शासनाने संबंधित कारखान्याचे चेअरमन व सर्व संचालक मंडळावर त्वरित गुन्हे दाखल करावेत. या व इतर मागण्यांसाठी क्रांतिदिनी सोमवार दिनांक ९ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर स्वतंत्र क्रांतिकारी लोकसेवा संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे,अशी माहिती राजेंद्र म्हस्के यांनी दिली आहे.यावेळी अनिल ठवाळ, सुभाष दरेकर, प्रशांत दरेकर, संतोष इथापे, माऊली मोटे, नंदकुमार ताडे, भाऊसाहेब मांडे, वामन भदे, सुरेश सुपेकर, बळीराम बोडखे, रघुनाथ सुर्यवंशी, दत्तात्रय जामदार, संतोष शिंदे, महादेव म्हस्के, कांतिलाल कोकाटे,रमेश गिरमे,संजय मडके, शिवराज ताडे, अक्षय वागस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.