अहिल्यानगर

संत सेवालाल महाराजांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणणे गरजेचे- सहयोगी अधिष्ठाता डॉ.मिलिंद अहिरे

अहमदनगर/ जावेद शेख : संत सेवालाल महाराज बंजारा समाजातील लोकांसाठी काम करणारे संत होते. संत सेवालाल महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम समाजासाठी केले. समाजामध्ये स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे, निसर्गाचे संरक्षण केले पाहिजे हे विचार संत सेवालाल महाराज यांनी समाजाला दिले. हे विचार सध्याच्या परिस्थितीत सुद्धा अत्यंत गरजेचे आहेत व त्यांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले. संत सेवालाल महाराज यांची जयंती भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हाळगाव येथे साजरी करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. अहिरे बोलत होते. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.अहिरे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आठव्या सत्रातील उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी कु.अक्षता अन्नदाते व संग्रामसिंग पायघन यांनी संत सेवालाल महाराज यांचे विषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व कार्यक्रमाला उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रद्धा नवले यांनी केले तर उपस्थितांचे आभार महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.चारुदत्त चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कोरोना विषयी नियमाचे तंतोतंत पालन करण्यात आले.

Related Articles

Back to top button