कृषी
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या को ८६०३२ ऊस वाणाची कृपा
राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या संशोधन केंद्राने सन १९९६ साली उसाची को ८६०३२ ही जात महाराष्ट्रामध्ये तिन्ही हंगामासाठी लागवडीकरिता शिफारस केलेली आहे. या ऊसाच्या वाणास या वर्षी २५ वर्षे पूर्ण झालेले आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षात दुग्धशर्करायोग्य म्हणून मौजे चोराडी, ता. खटाव, जि. सातारा येथील बापू आण्णा पिसाळ या शेतकर्याने विद्यापीठाने प्रसारित केलेल्या ऊस वाण को ८६०३२ लागवडीमधून त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम झाली असल्याने आलेल्या उत्पन्नातून ११०० चौरस फुट बंगला बांधलेला आहे. या ऊस वाण लागवडीमुळे उत्तम प्रपंच करूनही त्यांची आर्थिक दरी उंचावल्याने त्यांनी या नवीन बंगल्याला ८६०३२ ची कृपा हे नाव देऊन बंगल्यावर या ऊस वाणाचे पेटिंग केलेले आहे. सदर वाण हे पाडेगाव संशोधन केंद्राने शिफारस केल्यामुळे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व ऊस संशोधन केंद्रातील शात्रज्ञांना त्यांचा अभिमान आहे.
त्याचबरोबर त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व संचालक डॉ. शरद गडाख, डॉ. अशोक फरांदे यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अशा शेतकर्यांचा आदर सन्मान करावा व त्यांची भेट व मुलाखत घेणेसाठी नुकतेच मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या केंद्राचे प्रमुख ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर व त्यांच्या समवेत या केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. गारकर, डॉ. घोडके, डॉ. उबाळे, डॉ. सौ. शेळके, डॉ. थोरवे या शास्त्रज्ञांच्या व शेतकरी बांधवांसमवेत बापू कृष्णा पिसाळ यांना फेटा, श्रीफळ, ऊस मार्गदर्शन पुस्तिका व महात्मा फुले कृषि विद्यपीठाची कृषि दैनंदिनी देऊन सन्मानीत करण्यात आले. त्यांच्या मुलाखतीनंतर एकरी १०० टन व त्याहुन अधिक उत्पादन कसे घेता येईल.त्याचबरोबर उत्तम खोडवा व्यस्थापन, पाचट कुट्टी करून कुजवणे, ऊस बेणेमळा याबाबत डॉ. रासकर यांनी मार्गदर्शन केले.