निधन वार्ता

कृषी विद्यापीठाचे पहिले संशोधन संचालक डॉ. डी.जी. भापकर यांचे निधन

राहुरी प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे पहिले संशोधन संचालक डॉ. डी.जी. भापकर यांचे बुधवारी रात्री दुःखद निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर १ एप्रिल १९८१ ते ऑगस्ट १९८५ या काळात डॉ. भापकर हे विद्यापीठाचे पहिले संशोधन संचालक म्हणून कार्यरत होते. १९२९ मध्ये जन्म झालेल्या डॉ. भापकर यांचे विद्यापीठाच्या संशोधन कार्यात बहुमोल योगदान राहिले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात त्यांनी भात पैदासकार म्हणून उल्लेखनीय संशोधन कार्य केले. त्यांनी भात पिकाच्या विविध जाती विकसित केल्या. यामध्ये कर्जत १८४ या प्रचलीत वाणाचा समावेश आहे. नोबल पुरस्कार विजेते डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या कृषि संशोधन केंद्र, निफाड येथील भेटीत डॉ. भापकर यांनी विद्यापीठाची संशोधन उपलब्धी सादर केली. संशोधन संचालकपदी असताना त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्याकडे विद्यापीठाचे अडीचशे संशोधनाचे प्रस्ताव पाठवून ती मंजूर झाली. त्यांच्या काळात आले हे पीक प्रथमच विद्यापीठाच्या संशोधन परीघात आले. उसाच्या नवीन जाती, उसापासून गूळ निर्मिती तंत्रज्ञान, बाजरी उत्पादन तंत्रज्ञान त्याचप्रमाणे ऊस पिकामधील बटाटा, मका यासारख्या पिकांचे आंतरपीक म्हणून वापर अशा विविध बाबींवर संशोधनात त्यांचा पुढाकार होता. विद्यापीठ कर्मचार्यांसाठी राहुरी येथे कृषि विज्ञान सहकारी पतसंस्था स्थापन करण्यामागे त्यांचे मोठे योगदान होते. विद्यापीठाच्या संशोधनाचा लाभ शेतकर्यांना झाला पाहिजे असा ध्यास त्यांनी शेवटपर्यंत घेतला. त्याचप्रमाणे पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या सल्लागारपदी म्हणून त्यांनी कार्य केले. खाजगी क्षेत्रात देखिल ते कार्यरत राहिले. नवी दिल्लीच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे यांचे ते सासरे होते. डॉ. भापकर यांच्या निधनाने कृषि विद्यापीठ परिवाराने दुःख व्यक्त केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button