अहिल्यानगर
खांडगांव ते पेमगिरी रस्त्याची दुरावस्था, प्रशासनही निद्रेत ?
संगमनेर प्रतिनिधी : तालुक्यातील खांडगाव ते पेमगिरी हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून प्रवाश्यांना त्याचा फटका बसत आहे.रस्त्याला खड्डेच खड्डे पडल्याने तसेच आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या खड्यात पाणी साचलेले आहे.परिणामी वाहन चालकाला गाडी चालवताना खड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभव जास्त आहे.हा रस्ता खांडगाव पासून निमज- धांदरफळ- निमगाव पागा व शेवटी पेमगिरीला जातो.एकूण २० किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. या रस्त्यावर प्रामुख्याने स्वराज्य संकल्प भूमी पेमगिरी येथे वटवृक्ष व शहागडावर येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ जास्त असते.तसेच ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी उद्योग, व्यवसाय व नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांना खराब रस्त्यामुळे व वेळेत कामावर न पोहोचल्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.पेट्रोल बरोबर ग्राहकांकडून टॅक्स वसुल करणारे, तसेच नवीन गाडी विकत घेतानाही रोड टॅक्स घेतला जातो मग नागरिकांच्या मूलभूत सुविधांच रक्षण कोणी करायचं,असा प्रश्न एखाद्याला पडल्यास त्यात नवल वाटायला नको.खड्डे पडलेल्या रस्त्यावर कधी कधी भयानक अपघात होऊ शकतात याची जबाबदारी कोण घेणार? प्रत्येक वेळी रस्त्याची फक्त तात्पुरती डागडुजी केली जाते. त्यामुळे रस्ता पुन्हा लवकरच खराब होतो. प्रशासनातील संबंधित विभागाने लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरु करावे.अन्यथा रस्त्यावर पडलेल्या खड्यावर वृक्षारोपण करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा युवा कार्यकर्ते इंजि.आशिष कानवडे,क्रांतीसेनेचे युवराज सातपुते, अमित कोल्हे, बाळासाहेब भोर यांनी दिला आहे.
“कोरोना सारख्या महामारी मुळे गोरगरीब जनता आधीच अडचणीत आहे,त्यात पेट्रोल, डिझेल दरवाढ यात रस्त्याची दुरवस्था. यामुळे वाहनाचे नुकसान आणि शारीरिक वेदना वाढत आहेत,अपघात ही होत आहेत.प्रशासनाने त्वरित कारवाई करून लवकरात लवकर काम सुरू करावे.सामान्य जनतेच्या उद्रेकाची वाट बघू नये.”
– इंजि. आशिष कानवडे
क्रांतीसेना करणार पाठपुरावा – बाळासाहेब भोर
प्रशासनाने सर्वसामान्य प्रवाश्यांच्या जीवाशी खेळू नये. येत्या काही दिवसात खांडगाव ते पेमगिरी हा रस्ता जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत क्रांतीसेनेच्या वतीने पाठपुरावा सुरूच राहील.