अहिल्यानगर
महात्मा फुले कृषि विद्यापीठात लसीकरण मोहीम
राहुरी (प्रतिनिधी) : कोव्हीडच्या पहिल्या व दुसर्या लाटेनंतर तिसर्या लाटेची संभावना व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रयत्नाने विद्यापीठाच्या कर्मचार्यांसाठी कृषि विद्यापीठात लसीकरण केंद्र सुरु केले आहे. यासाठी मा. कुलगुरुंनी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करुन विद्यापीठाची परिस्थिती मांडली. जिल्हाधिकार्यांनी मागणी मान्य करुन कृषि विद्यापीठात विद्यापीठाच्या कर्मचार्यांसाठी लसीकरण केंद्र सुरु करण्याची परवानगी दिली. आज कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कुलगुरुंच्या हस्ते लसीकरण करणार्या आरोग्य कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. मा. कुलगुरुंनी कोव्हीशीड या लसीचा सपत्नी दुसरा डोस घेतला. याप्रसंगी कुलसचिव डॉ. महानंद माने, सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, विद्यापीठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली हिले, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे, तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. हिले म्हणाल्या जून महिन्यात एकुण शंभर कर्मचार्यांची लसीकरण करण्यात आले आणि आज 55 कर्मचार्यांचे लसीकरण करण्यात आले. सध्या हे लसीकरण ज्यांची पहिली लस झालेली आहे व दुसर्या लसीसाठी पात्र आहे अशा कर्मचार्यांसाठी हे लसीकरण होत आहे. हे लसीकरण रॅपीड अँन्टीजन टेस्ट करुन, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायजेशन करुन केले जात आहे. विद्यापीठात सुरु झालेल्या लसीकरणाच्या मोहिमेमुळे विद्यापीठाच्या सर्व स्तरातून मा. कुलगुरु आणि जिल्हाधिकार्यांचे अभिनंदन होत आहे.