कृषी
महोगनी वृक्ष लागवड प्रस्तावांना मान्यता देण्याचे आदेश
श्रीगोंदा – जिल्ह्यातील महोगनी वृक्ष लागवडीचे प्रस्ताव मग्रारोहयो अंतर्गत मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याबाबत अखिल भारतीय क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर व श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप डेबरे यांनी श्रीगोंदा गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांची भेट घेत प्रस्ताव मंजूर करण्याबाबत निवेदन दिले होते.
सविस्तर वृत्त असे की,महोगनी वृक्ष लागवड प्रस्तावांना अहमदनगर जिल्ह्यात मंजुरी मिळत नसल्याने शेतकर्यांनी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर यांची भेट घेत याबाबत तक्रार केली होती.दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत श्रीगोंदा गटविकास अधिकारी प्रशांत काळे व जिल्हा परिषद अहमदनगर मग्रारोहयोचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक वेले यांना निवेदन देत प्रस्ताव मंजूर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा,अन्यथा अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.याबाबत जिल्हा परिषदेचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक मग्रारोहयो यांनी दखल घेत मग्रारोहयो अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत वृक्ष लागवड राबवण्याबाबत पंचायत समितीकडील कृषी अधिकारी यांनी तांत्रिक मान्यता द्यावी तसेच प्रशासकीय मान्यता गटविकास अधिकारी यांनी द्यावी अश्या सुचना जुन महिन्यात दिल्या आहेत.असे दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.