कृषी
शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरू करण्याची क्रांतीसेनेची मागणी
संगमनेर : शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा,अशा मागणीचे निवेदन संगमनेर कार्यालयाचे प्रांताधिकारी शशीकांत मंगरुळे,महावितरणचे सहाय्यक उपअभियंता भांगरे यांना अखिल भारतीय क्रांती सेनेच्या वतीने देण्यात आले.
तालुक्यातील गावांमध्ये बिबटे,वाघ अशा हिंस्र प्राण्यांनी मोठया प्रमाणात उच्छाद मांडला आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यातच महावितरण कंपनी एक आठवडा दिवसा व एक आठवडा रात्रीची थ्री फेज वीज पुरवठा करत आहे. हिंस्र प्राण्यांच्या भीतीमुळे शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाऊ शकत नाही. पिकांना पाणी असूनही शेतकरी हिंस्र प्राण्यांच्या भीतीमुळे रात्रीच्या वेळी शेतात जात नाही. परिणामी पिकांना वेळेत पाणी उपलब्ध न झाल्याने सरासरी उत्पादनात घट येऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.म्हणून महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतीसाठी दिवसा थ्री फेज वीज पुरवठा सुरु करावा.अन्यथा अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा युवक जिल्हाध्यक्ष इंजि. युवराज सातपुते, तालुका अध्यक्ष अमित कोल्हे,युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोर यांनी दिला आहे.