अहिल्यानगर
कोंढवड पुल दुरुस्तीची क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राहुरी – तालुक्यातील कोंढवड-तांदुळवाडी येथील मुळा नदीवरील पूलाचे स्टील उघडे पडलेले आहे.या पुलाच्या दुरूस्तीसाठी राहुरी येथील जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयास क्रांतीसेनेच्या वतीने निवेदने देण्यात आली.परंतु आजतागायत या कार्यालयाकडुन पत्र व्यवहारावरून कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली दिसुन येत नसल्याने व पुलाला मोठे भगदाड पडल्याने पुलाच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे ई-मेल द्वारे लक्ष वेधण्याचे काम अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी केले आहे.
कोंढवड-तांदुळवाडी येथील मुळा नदीवरील पुलाच्या स्लॅबचे स्टील उघडे पडलेले आहे व पुलाच्या स्लॅबला आरपार भगदाड पडले आहे.या पुलावरून परिसरातील नागरिक,विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात.या पुलाच्या उघड्या पडलेल्या स्टील व भगदाडामुळे हा पुल वाहतुकीसाठी तसेच दळणवळणासाठी धोकादायक झाला असल्याची परिस्थिती लक्षात घेता कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडण्याआधी या पुलाची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. तसेच या पुलाच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निवेदने देऊनही हा प्रश्न गांभीर्याने न घेता संदर्भानुसार योग्य वेळी कुठलीही ठोस कारवाई संबंधीत अधिकार्यांनी न केल्याने पुल कमकुवत झाला असल्याचे पुलाच्या स्लॅबला आरपार पडलेल्या भगदाडामुळे सिद्ध होत आहे.त्यामुळे या पुलामुळे कुठलीही अप्रिय घटना घडल्यास तसेच जीवीतहानी झाल्यास या संबंधीत आधिकार्यांना दोषी ठरवून कारवाई करण्यात यावी व पुलाच्या दुरुस्तीचा खर्च अधिकार्यांच्या दिरंगाई मुळे वाढणार असुन यामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण पडणार आहे.त्यामुळे दुरुस्तीचा अधिकचा खर्चही या अधिकाऱ्यांकडून वसुल करण्यात यावा.अशी मागणी अखिल भारतीय क्रांती सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, राहुरी तालुका अध्यक्ष संदीप उंडे,शिलेगावचे माजी सरपंच रमेश म्हसे,मच्छिंद्र पेरणे,जगन्नाथ म्हसे,गोरक्षनाथ म्हसे,किशोर म्हसे,रत्नकांत म्हसे,दिलीप म्हसे, गणेश गाढे,अमोल माळवदे,भाऊसाहेब पवार,राहुल हिवाळे,महेश ढोकणे आदींनी केली आहे.