अहिल्यानगर
वाघुडें येथील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी
अहमदनगर:मौजे वाघूडें,पारनेर येथे महिलेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी अखिल भारतीय क्रांतीसेना व भारत सेवक संघ यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील वाघुंडे येथील आदिवासी कुटुंबातील महिलेवर गावातील राजाराम तरटे या गावगुंडाने १३ फेब्रुवारी २०२० रोजी शेतात सदर महिलेवर अत्याचार केला होता. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका आरोपीस अटक करण्यात आली व त्याला १५ दिवसानंतर जामिनावर सोडण्यात आले. त्यानंतर अत्याचाराची तक्रार मागे घे, तुला पैसे देतो, नाहीतर तुला जीवे मारील,अशी धमकी दिली. त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी आरोपी राजू तरटे हा पुन्हा वाघुंडे शिवारातील महिलेच्या झोपडीजवळ आला व त्याने सदर महिलेची ११ वर्षाची मुलगी वृषाली बाळू भोसले हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. त्यात मुलगी गंभीर भाजली असुन त्यानंतर तिला उपचारासाठी निरामय हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०७ व ५०४ अन्वये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करण्यात यावी,अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर अखिल भारतीय क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख अक्षय मांडगे,नगर युवक तालुकाध्यक्ष सोमनाथ ठोकळ, युवक तालुका संपर्क प्रमुख सागर गाठे,युवक तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सरोदे, सरचिटणीस शरद निमसे,राजकुमार मौर्या, व भारत सेवक संघाचे कार्यकर्ते यांच्या स्वाक्षर्या आहेत.